
Jessie ला वाढवण्यात धमाल मजा येते. ती आली तेंव्हा दोन महिन्यांची होती, बरीचशी आमच्यावर आवलंबून असायची. तिचे खाणे पिणे, ओषध, शी शू, खेळ, मारामारी सगळे सांभाळण्यात मलाच दमल्या सारखे वाटायचे, पण तिचे मोठे होतानाचे आमचे अनुभवही तितकेच सुंदर आहेत म्हणून मुद्दाम लिहून ठेवतेय.
जेसीचा जन्म 30 जुलै चा, घरी आली ती बरोबर दोन महिन्यांची असताना 30 sept ला. तिला बेघर मांजरासाठी काम करणाऱ्या संस्थेतून आम्ही दत्तक घेतले. जेसी आली तेंव्हा नुकतीच तिच्या आईच्या दूधा पासून ती सूटी झाली होती त्यामुळे वरचे दूध तिला पचायला जड जात होते. मग, मी कोमट दूध आणि पाणी एकत्र करून मी द्यायचे. मी थोडे दिवसांनी तिला Jelly kitten food देणे चालू केले की बाई एकदम खुश झाल्या.
जेसीची कमाल गोष्ट म्हणजे आल्यापासून ती एकदाही रडली नाही. शक्यतो पिल्ल आई पासून दूर झाली की कावरी बावरी होऊन ओरडत राहतात पण जेसीचे सगळेच वेगळे होते. जेसी खूप खेळायची, अंगावर उड्या मारायची, तिच्या आईशी खेळावे तसे आमच्याशी खेळायला बघायची, नखं लावायची. आम्ही काही तिचे मांजर आई बाबा नव्हतो की तिची भावंडं नव्हतो तिचा खेळ आम्हाला बेजार करायचा. प्रसाद आणि माझ्या चेहऱ्यावर, हाता पायावर तिची नखांची नक्षी असायची. ती मोठी झाली तशी तिला खेळताना नख आत घेण्याची, कारणा शिवाय दातांचा जोर न लावण्याची समज येत गेली आणि आम्ही सुटकेचा श्वास टाकला.
मांजरांना Toilet training द्यायचे तर पूर्वी लोक बांधकामाची वाळू एका टब मध्ये ठेवायचे, त्या टबात मांजरांना शी, शू करायला शिकवायचे, टबची वाळू वेळोवेळी बदलली, टब साफ केला की काम व्हायचे. आता तयार litter Box (आपल्या भाषेत वाळूची पाटी) मिळतो. मला Eco friendly/ Biodegradable litter हवी होती म्हणून मी खास मांजरांसाठी तयार केलेला लाकडी भुसा वापरुन तयार केलेली litter आणायला सुरवात केली.
जेसीने Litter Box मध्ये शी, शू केली की ती वापरलेली Litter बाहेर झाडात खड्डा खणून टाकून द्यायचे आणि त्याचे नंतर खत व्हायचे. काही काळाने जेसी जेंव्हा घराबाहेर जाऊन खेळायला लागली तसे मी तिच्यासमोरच झाडात तिने वापरलेली वाळू टाकायला सुरवात केली. जेसिनेही मग हळू हळू वासा मागे जात बाहेर झाडाखाली आपापले शी शू करायला चालू केले आणि अश्या रीतीने तिचे toilet training पूर्ण झाले.
आमचे घर तळ मजल्यावर असल्याने तिला खिडकीतून घरा बाहेर जा ये करता येणार होते पण ती लहान असताना तिला खिडकीतून खाली उतरता यायचे नाही आणि वरतीही येता यायचे नाही. मग प्रसादने एक मोठी फांदी खिडकीच्या बाहेर न्हेऊन ठेवली. मी रोज खेळताना तिला त्यावर चढायला लावायचे थोडे दिवसातच ती स्वतंत्र पणे घरात ये जा करायला लागली.
तीन महिन्याची होई पर्यंत आम्ही जेसीला घराबाहेर सोडत नव्हतो कारण बाहेर मोठ्या बोक्यांचा धोका होता. पण जेसी सारखेच घराबाहेर जायला बघायची. मग मी harness विकत आणला. दोन चार दिवस मी तिला दामटून हारनेस घालून घराच्या अवती भोवती फिरवून आणले आणि जागेचे वास तिच्या लक्षात आल्यावर तिला एकटीला बाहेर सोडणे चालू केले. आता ती दूर दूर फिरून येते, रात्र रात्र बाहेर असते पण मला तिची काळजी नसते.
साडे तीन महिन्याची झाल्यावर जेसी मधूनच सगळीकडचे वास घ्यायची, लोळायची, वेगळे वेगळे आवाज काढायची. ती वयात आली आहे/ heat वर आली आणि बोक्याच्या/ जोडीदाराच्या शोधात आहे हे मला लक्षात आले पण मांजरी तर सहाव्या महिन्यात वयात येतात हीचे काय वेगळे म्हणून मी तिला डॉक्टर कडे नेले. डॉक्टरनीही जेसी वयात आल्याचे सांगितले . मन्या वयात लवकर आल्या तरी सहा महिन्या पर्यंत त्यांना pregnancy चा धोका नसतो त्यांचे female organs ची तेव्हढी वाढ झालेली नसते. सहा महिन्यांनी तिला neuter करायचे आम्ही ठरवले. बाहेर इतकी भटकी पिल्लं घरांशिवाय हलाखीत असताना त्यात आणखी भर नको आणि जेसीच्या तब्येतीला त्रास नको म्हणून neuter करायचे म्हणजे माणसाच्या भाषेत family planning चे ऑपरेशन करायचे ठरवले.
पूर्वी आणि अजूनही ऑपरेशन करताना पोटावर टाके घेतले जातात, ते वाळायला वेळ लागतो, मांजरांना ते चाटून उपसून काढता येतात, खेळताना ते तुटू शकतात म्हणून मला जून्या पद्धतीने ऑपरेशन नको होते. ह्याउलट पायाच्या वरती टाके देऊन ऑपरेशन करणारे डॉकटर मी शोध शोध शोधले. नव्या पद्धतीने ऑपरेशन सोपे गेले, पाच दिवस तिचे खाणे पिणे, औषध, खेळ सगळ्यावर बारीक लक्ष ठेवून आम्ही होतो. ते दिवस अवघड होते.
आता जेसीचे डॉकटर तिची रेबीज ची, cat flue ची इंजेक्शन द्यायला घरी येतात. मी तिच्या deworming च्या तारखा लिहून ठेवते. जेसीच्या अंगावर कधी पिसवा दिसल्या तर मी तिला spot on लावते. तिचे केस इकडे तिकडे पडू नयेत म्हणून एका वेळीच तिचे केस निट विंचरुन घेते.
हे सगळे करताना बाईंचे रोज नवे उद्योग असतात. जेसीला कितीही घरी चांगले खायला दिले तरी बाहेरून शिकार करून ती घरी आम्हाला दाखवायला घेऊन येते. तिची शिकार म्हणजे झुरळ, पाल, उंदीर, पक्षी .. फार चिडचिड होते अश्यावेळी. हलली मी तिच्या शिकारी सकट तिला बाहेर पळवून लावते, मग ती नाईलाजाने बाहेरच्या बाहेर खेळते/ खाते काहीतरी करते आणि मग घरी येते.
सध्या आमच्या घरा जवळचा मंजू नावाचा बोका तिचा मित्र झाला आहे. जेसी आमच्या कडून मागून मागून कॅटफूड घेते आणि ते खायला मंजूला घरी बोलावते. जेसी बरोबर ह्या नवीन जावयाची जबाबदारी आमच्यावर पडते की काय असे वाटायला लागले आहे.
जेसी आम्हाला प्रचंड जीव लावते, मी कधी निराश असेल तर माझ्या जवळ येऊन बसते. प्रसाद चालायला गेला की त्याच्या मागे मागे धावते. तिचे खेळ, नखरे सगळं सगळं अगदी वेड लावणार आहे 😊

