
मानसिक आजाराला सामोरे जाताना, खालील गोंष्टी महत्वाच्या ठरतात.
1) स्वताला किंवा जवळच्या व्यक्तीला काही एक मानसिक त्रास आहे हे मान्य करणे ही प्राथमिक पायरी आहे.
2) शहरी भागात जागोजागी psychiatrists आणि psychologist असतात. चार जणांशी बोलून अचूक निदान करणारे, अनुभवी डॉकटर शोधून काढणे फार महत्वाचे असते. शक्यतो Google reviews वरती विसंबून राहू नये असे मला वाटते. अनुभवी psychiatrist तुम्हाला काही आजार आहे किंवा ती तुमची नेहमीची चिंता आहे हेही सांगतो. आजार असेल तर तुमच्या लक्षणानंवरुन आजाराचे योग्य निदान करतो आणि त्यासाठी औषध उपचार सुचवतो.
3) नंतरच्या टप्प्यात येतो तो psychologist. अनुभवी psychologist ही शोधवाच लागतो. त्याला सगळ्या मानसिक आजारांची इत्तंभूत माहिती असावी लागते. अनुभवी psychologist तुमचा आजार, त्यातल्या विचारांचे पॅटर्न, तुमच्या भावना तुम्हाला समजावून सांगतो.
4) मानसिक आजारांचे हजार प्रकार आहेत त्यातल्या प्रत्येकाची लक्षण वेगळी असतात. त्यामुळे नुसते झोप, भूक, रोजचे काम ठीक चालू आहे ना ह्यावर आजाराचे असणे / नसणे ठरत नाही म्हणून डॉक्टर अनुभवी असणे गरजेचे असते.
5) एक लक्षात घ्यावे लागते की औषध/ गोळ्या हा treatment मधला फकत एक भाग असतो. त्या बरोबर अनेक गोष्टी करायच्या असतात. जसे की स्वताचा आजार समजून घेणे, त्याचा पॅटर्न समजून घेणे, त्रास देणारे विचार, भावना ह्यांची वेळोवेळी नोंद करून ठेवणे, आपल्या प्रकृतीला झेपू शकेल असा व्यायाम प्रकार ठरवणे, आहार ठरवणे, कामाचे स्वरूप ठरवणे ई.
6)आणखी एक महत्वाचे म्हणजे प्रत्येक मानसिक आजार वेगळा असतो. अगदी anxiety disorder हा आजार बघितला तरी प्रत्येकाला वाटणारी anxiety वेगळ्या प्रकारची असते, त्या मागचे विचार, भावना वेगळ्या असतात. म्हणून व्यक्ती निहाय औषध – उपचार बदलत असतात.
7) आपल्या कडे सल्ले देणारे हजार असतात. मात्र psychiatrist, psychologist आणि जवळची एकव्यक्ती सोडून फार कोणाच ऐकू नये कारण त्यातून आपला गोंधळ वाढण्याची शक्यता असते.
8) आपण जेंव्हा स्वतच्या मनाचा , विचारांचा, भावनांचा अभ्यास करायला लागतो तेंव्हा आजाराची भिती वाटणे थांबते. मानसिक आजार हे एक कोडे आहे जे स्वतःलाच प्रयत्न पूर्वक सोडवायला लागते, एकदा ती जबाबदारी घेतली की जे empowered feeling येते ते आजारातून बरे होण्यासाठी फार महत्वाचे ठरते. तुमचा treatment plan ठरवताना तुम्ही तुमचे म्हणणे, विचार डॉक्टरानसमोर मांडणे गरजेचे असते. आपल्याला मानसिक आजार आहे म्हणून गर्भगळीत होऊन इतरांच्या हातात स्वतच्या जगण्याच्या किल्ल्या सोपवू नयेत.
9) मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीने कामात व्यस्त असणे गरजेचे असते. शक्यतो ते काम आवडीचे असावे नाहीतर कामाचे नवीन ताण निर्माण होऊ शकतात. पुर्णवेळ घर सांभाळायचे किंवा नोकरी करायची किंवा फ्रीलांस करायचे किंवा आणखी काही ते आपली आवड आणि कौटुंबिक गरजा दोन्ही लक्षात घेऊन ठरवायचे.
10) ‘रिकाम्या वेळेत मनात नाहीते विचार येतात म्हणून मानसिक आजारी व्यक्तींनी कामात व्यस्त असावे’ असे आजूबाजूचेही सुचवत असतात तेंव्हा, “विचारांना घाबरून त्या पासून पळ काढायला म्हणून आपण जादाची कामं वाढवून घेत नाही ना” ? हाही विचार करायचा.
11) हल्ली अनेक motivational speaker बोलता बोलता “आपण मानसिक आजारावर विजय मिळवू शकतो” अशी विधाने करतात. पण खरे बघायचे तर मानसिक आजार आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात तुमच्या बेसावध क्षणी परत कधीही तुम्हाला गाठू शकतो. महत्वाचे हे की एकदा आजार समजून घेऊन त्याला नियंत्रणात ठेवायची कौशल्य आपण शिकून घेतली की मग आजाराची भिती वाटणेही बंद होते.
12) प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिचे स्वतः चे खास असे गुण, कौशल्य असतात हे लक्षात ठेवायचे. आपल्या गुणांना, कौशल्याना वाव मिळेल ह्या साठी प्रयत्न करत रहायचे आणि मुख्य म्हणजे इतरांशी तुलना करणे टाळायचे.
13) आत्मविश्वास रोज कमवावा लागतो हे लक्षात ठेवायचे. नवीन काहीतरी करत, शिकत रहायच आणि ते करताना स्वतः ला चुकायची परवानगीही द्यायची.
शेवटचे आणि महत्वाचे
मानसिक आजार आपल्याला संवेदनशील बनवतात, माणूस म्हणून घडवतात, आपल्या बरोबर इतरांच्या प्रश्नांबद्दल सजग व्हायला मदत करतात. आपल्याला आपल्या त्रासाचे करूणेत रूपांतर करता आले तर त्या सारखे सुंदर दुसरे काही नाही ❤️

