
सकाळी बातमी वाचली की हडपसर येथील निवासी सोसायटी मध्ये एका 3BHK घरात जवळपास 300 मांजरं पालिकेच्या लोकांना आढळली. कमी जागा, अमर्याद वाढलेली मांजरांची संख्या, अस्वच्छता, प्राण्यांच्या तब्येतीची हेळसांड हे काही प्राणी प्रेम नव्हे उलट अस्वच्छता, वास, दुषित हवा ह्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न मात्र सदर कुटुंबाने निर्माण करुन ठेवला. आपल्या इथे प्रशासन तर असे की लोक महापालिके कडे वर्ष दोन वर्ष तक्रार करत आहेत तेंव्हा कोठे आता कारवाई होते आहे.
“नुसते खायला देणे म्हणजे प्राणीप्रेम नव्हे.” Survival of the fittest हा प्राण्यांसाठीचा निसर्गाने घातलेला नियम. जेंव्हा माणूस त्यांना खायला देतो तेंव्हाच तो प्राण्याच्या जगण्यात हस्तक्षेप करत असतो. माणसाने प्राण्याला खायला दिले की त्याचे आयुर्मान वाढणार, प्रजनन क्षमता वाढणार आणि प्राण्यांची संख्या वाढणार. प्राण्यांची अमर्याद संख्या ही पेस्ट ठरते ती man v/s animal conflict निर्माण करते.
जंगली प्राण्याला खायला देणे उदा. माकड हे तर बेकायदेशीरच आहे. पाळीव प्राण्यांना खायला द्यायचे असेल तर त्याच्या आरोग्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारायला लागते. Rabies Vaccination and neutering ह्याला पर्याय नाही.
शहरी भागात, निवासी सोसायटी मध्ये लहान जागेत प्राणी पाळायचे तर ईतर रहिवाश्यांना आपल्या प्राणीप्रेमाचा त्रास होणार नाही हे बघायलाच हवे. रेबीज आहेच पण नसबंदी शस्त्रक्रिया गरजेची आहे. मांजरे तर दर तीन महिन्यांनी पिल्लांना जन्म देतात. पाळलेल्या मांजराची ही इतकी पिल्ले अशीच रस्त्यावर सोडून त्यांची संख्या वाढवण्यापेक्षा neutering चांगले, जे मांजरीच्या तब्येतीसाठी चांगले असते. पाळीव बोक्यांचीही शस्त्रक्रिया करावी लागते कारण ते हिट वर येतात मांजरींसाठी कधी हद्दी वरून एकमेकांत भांडत राहतात, जखमी होतात, हद्द सोडून जातात. त्यांच्या भांडणात त्यांच्या जिवाला त्रास होतोच बरोबरीने त्यांच्या आवाजाने माणसासाठी डोकेदुखी होऊन बसते. घरात एकच ठिकाणी मांजरांना खायला देणे, टॉयलेट training देणे हे ही गरजेचे जेणेकरून घराबाहेर जिन्यात अस्वच्छता होणार नाही.
आता हा इतका प्रश्न ग्रामीण भागात येत नसावा. माझी ग्रामीण भागातून आलेली मैत्रीण म्हणाली “पाळीव प्राणी म्हणून आम्ही त्यांचे वेगळे असे काही करतं नाही. ती आमच्या जगण्याचा भाग असतात पण आमच्यावर अवलंबून नसतात. कधी मांजर, कुत्र दारात आलं तर कधीतरी कोणीतरी त्याला खायला देतं बाकी ती स्वतंत्र वाढतात. कुठे जातात, कुठे पिल्लांना जन्म देतात हे इतक आम्हाला कळतही नाही शेतात आवारात कुठे कुठे फिरत असतात.”
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था असतात पण त्यातल्या कुठल्या चांगल्या कुठल्या फसवेगिरी करणाऱ्या हे नीट बघावेच लागते. माझी एक मांजरप्रेमी मैत्रीण एका संस्थेबद्दल सांगत होती,” सदर संस्था येते, भटकी मांजरं पकडून, शस्त्रक्रिया न करताच, शस्त्रक्रिया केल्याची खूण करून मांजराना तसेच इतरत्र सोडून देते. (खूण म्हणून भटक्या neutered मांजरांच्या कानाचे वरचे किंचित टोक कापून टाकतात, परत शस्त्रक्रिया केली जाऊ नये म्हणून)
पालिकेच्या कामाबद्दल तर काय बोलायचे . माझ्या माहेरी सांगली मध्ये एक प्राणीप्रेमी डॉक्टर आपणहून महापालिके बरोबर काम करायचे. डॉक्टरांनी त्यांच्या परिसरातल्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया केली तरी कुत्र्यांची संख्या थांबत नव्हती. नंतर लक्षात आले पालिकेचे लोक शहरातल्या ईतर भागातल्या कुत्र्याना ईकडे आणून सोडायचे. भटक्या कुत्र्यांची मजल शेतकऱ्यांच्या गोठ्यातल्या वासरांना मारून खाण्या पर्यंत गेली होती.
♦️निसर्गाचा समतोल बिघडवून माणूस आणि प्राणी ह्यात conflict निर्माण करणारे “माणसाचे वागणे” हे “प्राणीप्रेम” होत नाही♦️ हे लक्षात घ्यायला पाहिजे.
प्रेमात जबाबदारीची जाणीव असावी लागते आणि प्राणीप्रेमातही ती असावीच लागते.

