
मेघा स्वयंपाकघरात आवराआवरी करत असताना दारावरची बेल वाजली. मेघा हातातले काम बाजूला सारून नॅपकिनने हात पुसत दार उघडायला धावली. दारात निळ्या रंगाचा शर्ट पॅंट घातलेला मनुष्य उभा होता.
“गॅलरी साफ करायला सोसायटीच्या मॅनेजरनी संगितले आहे, त्या करता आलोय” निळ्या कपड्यातला मनुष्य उत्तरला.
मेघाने त्याला घरात घेतले. तिच्या मागोमाग तो मनुष्य हॉलच्या गॅलेरीमध्ये गेला आणि मोठा झाडू घेऊन साफसफाई करायला लागला. त्याच वेळेस, मेघाचा फोन वाजला. ती फोन घ्यायला जाईपर्यंत सफाई करणारा मनुष्य बेडरूमच्या गॅलरीकडे वळला होता. फोन उचलत मेघाही बेडरूमच्या दिशेने गेली.
“किती वेळ फोन उचलायला? काय करत होतीस ? फोनमधून शैलेशचा आवाज घुमला.
“अरे गॅलरी साफ करायला एकजण आला आहे त्याला सूचना देत होते.”
एकजण ? म्हणजे त्याला नाव गाव काही आहे की नाही? कोणी पाठवल होतं त्याला? युनिफॉर्म होता का अंगात? आय कार्ड बघितलस का ? कोणाला कस घरात घेतेस? तुला परवाच सांगितले होते, “मी नसताना कोणाला घरात घेऊ नकोस” असे कसे ग वेंधळ्यासारखे वागतेस ?
“मॅडम झाल बघा साफ करून” अस म्हणत निळ्या कपड्यातला मनुष्य तरातरा बाहेर निघाला. शैलेशला थांबवत मेघा काही बोलणार तोपर्यंत तो सफाईकर्मचारी तिच्या डोळ्यासमोर गायबही झाला.
हॅलो मेघा, हॅलो काय विचारतोय मी ? लक्ष कुठे आहे तुझ? दे त्या माणसाकडे फोन, बघतो मी तो कोण आहे ते.”
“शैलेश अरे गेला तो माणूस त्याचे काम करून”
“असा कसा गेला ? सोसायटीने नेमलेला माणूस असेल तर त्याने जाताना तुझी रजिस्टरवर सही घ्यायला हवी होती. कोण कुठला माणूस होता देव जाणे. दरवाजा आता बंद करून घे. सगळ्या खोल्यात जाऊन काही चोरीला गेले आहे का ते एकदा चेक कर. घरी आल्यावर मी सोसायटीच्या मॅनेजरशी बोलून सीसीटीव्ही चेक करतो. असे म्हणत शैलेशने फोन ठेवला.
मेघाचा चेहरा घामेजला होता, ती प्रत्येक खोलीत जात काही चोरीला गेले नाही न ते परत परत बघत राहिली. काहीतरी हरवले आहे असे तिला वाटत होते पण काय ते समजत नव्हते. मेघाने फ्रीज मधून पाण्याची थंड बाटली बाहेर काढली. थंड बाटली चेहरयाला लावली. कपाळावरुन घरंगळणार्या तिच्या घामाच्या थेंबात बाटलीवरचे गार थेंब मिसळले गेले. मेघा पाण्याची बाटली जवळ घेऊन नेमके काय काय घडले ह्याचा क्रम आठवत कितीतरी वेळ बसून राहिली.
शैलेश रात्री बर्याच उशिरा घरी आला आणि न जेवता झोपून गेला. मेघाला शैलेशशी बोलायचे होते पण ते मात्र राहूनच गेले.
—
दुसर्या दिवशी रात्री त्यांच्याकडे जेवायला शैलेशचे मित्र मैत्रीण येणार होते. घरी येणार्या पाहुण्यांच्या सरबराईत काही कमी पडू नये ह्यासाठी मेघा तयारी करत होती. मेघाने घराची सफाई करून घेतली, पाहुण्यांना द्यायच्या गिफ्ट्सचे पॅकिंग करून ठेवले. पावभाजीचा बेत होता तर सगळ्या भाज्या चिरून ठेवल्या, शेजारच्या मिठाईच्या दुकानातून शैलेशने सांगितल्याप्रमाणे गुलाबजामही सकाळीच मागवून ठेवले.
संध्याकाळी झाडांना पाणी घालून झाल्यावर मेघा स्वयंपाकघरात गेली. एकीकडे भाजी काढईत तयार होत असताना दुसरीकडे तिने तव्यावर पाव भाजायला घेतले. पाव मध्यभागी कापून त्याला बटर लावून तव्यावर शेकत असताना, तिच्या हाताला गरम तव्याचा चटका बसला. “आईग” मेघा कळवळली. दुसर्या खोलीतून शैलेश धावत आला.
“काय ग सारखी धडपडत असतेस? बाजूला हो आता . मी पाव भाजतो, तू जाऊन हाताला क्रीम लाव आणि हो हाताला पाणी लागू देऊ नको.”
“अरे फारस काही नाही लागलं, मी भाजते ब्रेड आणि आवरते सगळ”
नको बाई, शांत बैस एका ठिकाणी आता, नाहीतर आणखी काहीतरी उद्योग करून ठेवशील. मेघा हिरमुसली. कितीही काळजी घेतली तरी काही तरी घडतेच ह्याचे तिला दू:ख वाटले.
थोड्या वेळाने एक एक करत पाहुणे आले. गप्पा टप्पा चालू झाल्या. शैलेशला स्वयंपाक घरात काम करताना बघून मिथीला मेघाला म्हणाली, “किती काळजी घेतो नाही का शैलेश तुझी?
एकीकडे मोठ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि तिकडे गॅलरीत लहान मुलांचा दंगा चालू होता. त्यातल्या एकाने खेळता खेळता भोकाड पसरले. आवाज ऐकून सगळे ग्यालेरीकडे धावले.
शैलेश पुढे मुलांच्या गराड्यात जात म्हणाला, “शांत व्हा मुलांनो, उरलेला खेळ नंतर खेळा, आत्ता आपण सगळ्यांनी मिळून आइसक्रीम खायचे आहे.” मुले येs य करत हॉलमध्ये आली. शैलेशने मेघाला आईसक्रीम आणायला संगितले. मेघा मात्र शैलेशकडे प्रश्नार्थक चेहर्याने बघत राहिली.
“अग, असे काय बघतेस, फ्रीज मधले आईसक्रीम आण ना”
“अरे आपले गुलाबजाम आणायचे ठरले होते तर तेच मी मागवून ठेवले आहेत.”
“आईसक्रीम पाहिजे” मगाशच्या लहानग्या मुलाने परत रडायला चालू केले.
“असे कसे विसरतेस ग तू ? मुलं येणार तर त्यांच्यासाठी आईसक्रीम आणायला हवे हे मी बोललो होतो. किती काय काय मी लक्षात ठेवायचे? मागवतो मी आता आईसक्रीम zomato वरुन”
पाण्याचे ग्लास आणायच्या निमित्ताने मेघा स्वयंपाकघरात गेली पण तिला रहावत नव्हते. ओट्याला धरून उभे राहत स्वताला आधार देत ती शांत व्हायचा प्रयत्न करत होती पण तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत राहिले.
आईसक्रीम आल्यावर मुलं खुश झाली. खानपान झाल्यानंतर, भेटवस्तूंची देवघेव झाली, पाहुणे पाहुणचार घेऊन निघून गेले.
“मेघा सॉरी गा, मी जरा जास्त चिडतो का हल्ली? पण तू काही ना काही गडबड करतेस, काळजी वाटते मला तुझी, मी नसतो तर एकटीने कसे काय निभावले असतेस तू? ऑफिसमध्ये असलो तरी मला घरची चिंता असते म्हणून मी तुला सारखे फोन करत राहतो. जे मी वागतो ते फक्त तुझ्या काळजीपोटी. परत एकदा सॉरी, फार विचार करु आता हयावर, झोप शांतपणे” एवढे बोलून शैलेस बेडरूमकडे वळला.
तो विचार करू नको म्हणाला तरी मेघाच्या मनातले विचार काही थांबत नव्हते. तिला कळत नव्हते आपण गोंधळंलेले का असतो? सारखे का विसरतो? सारख्या चुका का करतो? आपल्याला काही मानसिक आजार तर झाला नाही ना ? माझ्यामुळे शैलेशला किती त्रास होतो. त्याने किती केले आहे आपल्यासाठी. आमच्या बाबांची परीस्थिती नव्हती तर लग्नाचा सगळा भार त्याने उचलला, धाकट्या बहिणीला नोकरी मिळवण्यासाठी मदत केली. आई तर म्हणतच असते मुलीने नशीब काढले म्हणून. मागे निशाशी, माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणीशी सहज आम्हा नवरा बायको मध्ये होणार्या कुरबुरीं बद्दल बोलत होते तर म्हणाली, “अग मेघा, तुझ्या नवर्याचे वागणे म्हणजे Gaslighting च झाले ग.” निशा काहीतरी बोलते झालं. तिला तरी वैवाहिक नात्यातले काय कळणार म्हणा, ती स्वता लग्न न करता एकटीच तर राहते. शैलेश म्हणतो ते बरोबरच आहे आपले प्रॉब्लेम्स कोणाला सांगू नयेत.
—
काही दिवसानी, एके सकाळी मेघाला आपली पाळी चुकल्याचे लक्षात आले. “आपण प्रेग्नंट तर नाही ना?” तिच्या मनात शंका आली. तिच्या चेहर्यावर स्मित हास्य उमटले, आपल्याला बाळ झाले तर आपण बाळाला वाढवण्यात रमून जाऊ, घरचे वातावरण ही बदलेल असे तिला वाटले.
“शैलेश बहुतेक मी प्रेग्नंट आहे, अजून टेस्ट केली नाही, पण माझी पाळी चुकली आहे, मला आतून वाटते आहे की मी आई होणार आहे.”
“प्रेग्नंट? अचानक कसे काय ? आपण तर निट काळजी घेत होतो ना ? मग ? आता कुठे नव्या जॉब मध्ये मी रूळतो आहे. तुझी आई आजारी ती काय तुझ्या मदतीला येऊ शकणार नाही आणि मी काही तुला तुझ्या माहेरी त्या लहान गावात पाठवणार नाही, तिथे काही चांगली हॉस्पिटल असण्याची शक्यता नाही. तुला स्वतचेच काही झेपत नाही आणि त्यात तू बाळाची जबाबदारी कशी घेणारेस? सगळ मलाच बघायला लागणारे. बर, असुदे तू टेस्ट करून घे, बघू काढेन मी मार्ग सगळ्यातून, तू काळजी करू नको.”
शैलेशचे बोलणे ऐकून मेघाचा चेहरा खरकन उतरला. “आपण मुलं वाढवण्यास सक्षम नाही आहोत का? शैलेशची जबाबदारी वाढेल का ह्या सगळ्यात? माझ्यामुळे त्याला फार त्रास होतो. काय करू? मी काय करू? काही कळत नाही.” शंका, अपराधी भावना, हतबलता, भिती आणि अनिश्चितता ह्या भावनांच्या फेर्यात मेघा परत एकदा अलगत अडकली होती.
समाप्त


