मुलांच्या करिअरची चिंता

मुलांच्या करिअर मध्ये येणारे अडथळे बघितले तर लक्षात येते की शिक्षण आणि प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी करावे लागणारे काम ह्यात बरेच अंतर असते. दुसरे, शिक्षणाचा दर्जा खालावत जात आहे त्यामुळे कंपन्यांना अपेक्षित गुणवत्ता असणारे कर्मचारी मिळणे कठीण होत आहे. कंपन्यांना नव्याने रुजू झालेल्या कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी बराच वेळ आणि संसाधने खर्च करावी लागतात.

आणखी एक मुद्दा म्हणजे आपल्याकडे व्यवसाय पुरक वातावरण नाही त्यामुळे बेरोजगारीही वाढत आहे. शिक्षण असून हाताला काम मिळत नाही ह्या उदासीनते मध्ये तरुण मुलं आहेत. अश्या परिस्थितीत आपल्या हातात काय आहे ते बघू. हे खास करून मध्यम वर्गीय पालकांनी आणि मुलांनी लक्षात घेतले तर कुटुंबातले तणावाचे वातावरण कमी राहील.

1)मध्यम वर्गातली मुलं बराच काळ शिकत राहतात, तोपर्यंत ती आर्थिक दृष्ट्या पालकांवर अवलंबून असतात. पालकांनीही मुलांचे भरपूर आर्थिक लाड केलेले असतात. तरुण मुलांना, जर स्वतच्या वाढीव आर्थिक गरजाना पुरेसे उत्पन्न स्वतःला कमवता आले नाही तर त्यांना नैराश्य येण्याची शक्यता असते म्हणून मुलांवर किती खर्च करावेत ह्याचा पालकांनी आधीच विचार करून ठेवावा.

2) तरुण मुलांचे नोकरी, उत्पन्न चालू झाले तरी बर्‍याचदा त्यांना मिळालेल्या पैशाचे नियोजन कसे करावे हे कळत नाही कारण तशी सवयच कधी नसते. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून अमूक एक रक्कम महिना भर पुरवून वापरणे त्यातून बचत करणे ही सवय पालकांनी मुलांना लावली तर पुढे त्यांच्या साठीच सोपे होते.

3) शिक्षण नोकरी साठी मुलं बाहेर पडतात तेंव्हा स्वतःची आणि बाहेरची कामं करताना मुलांची तारांबळ उडते तेंव्हा लहानपणा पासून स्वतःची काम स्वतः करण्याची सवय मुलांना असेल तर त्यांना नवीन ठिकाणी adjust करणे सोपे जाते.

4)सुरवातीच्या दिवसात पालकांनी मुलांना अपेक्षित पगार मिळतो आहे का हयाकडे फार लक्ष देऊ नये किंवा त्यासाठी मुलांवर नकळत दबावही आणू नये. त्यांनी काम करणे त्यात स्थिरावणे हे आधी महत्वाचे असते.

5)मुलं जर आई वडिलां बरोबर त्यांच्या घरीच राहत असतील तर पालकांनी कमीपणा वाटून न घेता मुलांकडून आर्थिक contribution ची अपेक्षा करायला हवी तरच “जबाबदारीची” जाणीव मुलांना होऊ शकते.

6) तरुण मुला मुलींना सांगावेसे वाटते की शिकत असे पर्यंत सर्वांचे लक्ष अमुक एक पदवी आणि त्यात मिळालेले grades हयावरच असते पण प्रत्यक्ष कामं करताना चार भिन्न स्वभावाच्या लोकांशी जुळवून घेणे, ताण सहन करण्याची क्षमता, न कंटाळता/ मोबाईल हातात न घेता (मोबाईल ब्रेक न घेता) एक सलग एखादया टास्क वर काम करणे अश्या अनेक गोष्टी गरजेच्या असतात.

7) सुरवातीच्या काळात “अमुक एक प्रकारचे शिक्षण घेतले तर त्याच क्षेत्रात काम हवे” म्हणून जास्त काळ तरुणांनी अडून राहू नये. मिळेल ते काम करत पैसे मिळवणे चालू करणे गरजेचे असते. नोकरी मिळे पर्यंत internship किंवा तत्सम काहीतरी करत राहणे, occupied राहणे गरजेचे कारण मन भरकटू शकेल असे वातावरण सध्या आजूबाजूला उपलब्ध आहे.

8) तुम्ही उच्च शिक्षण घेतलेले असले तरी नंतरच्या काळात सतत शिकत रहावे लागते, ती तयारी ठेवावी लागते. पहिल्या नोकरीत, एका ठिकाणी किमान एक दीड वर्ष तरी तगून रहावे लागते. शिक्षण संपून नोकरी चालू करणे ही अगदी नवीन phase असते. नोकरीत नुसता पगार नाही तर वेळेवर कामावर जाणे – येणे, ह्याच बरोबर चार लोकांशी जुळवून काम करणे, ताण तणाव झेलणे अश्या अनेक सवई आपण अंगिकारत असतो तर अश्यावेळी संयम गरजेचा असतो हे लक्षात ठेवायचे.

हे केले तर करिअर निगडीत ताणतणाव आपल्या परीने कमी करता येणे शक्य आहे.

Social Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top