
आमची उषा आज्जी म्हणजे माझ्या वडिलांची आई अत्यंत हुशार, कणखर आणि शिस्तप्रिय होती. तिच्या राहण्यातही नेटकेपणा असायचा. चापून चोपून नेसलेली नववारी साडी, डोळ्यावर मोठ्या भिंगाचा चश्मा आणि गळ्यात बारीक मोत्यांची माळ हे आज्जीचे रूप अजूनही लक्ख समोर येते. आज्जी जाऊन अनेक वर्ष झाली पण मी मोठी होत गेले तशी आज्जी मला स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून समजत गेली.
उषा म्हणजे पूर्वाश्रमीची कृष्णा ही जबलपूरच्या मटंगे कुटुंबातली मुलगी. आज्जी चे वडील फिजिक्स चे नावाजलेले प्राध्यापक होते. मटंगे कुटूंब जबलपूरच्या कॉलेजच्या आवारात एका प्रशस्त बंगल्यात रहात होते. घरात गडीमाणसे – घोडागाडी – गायी असा थाट होता. घरात सुधारणावादी वातावरण होते. रोजच्या जगण्यात वाचन, लेखन, कला, संगीत यांना स्थान होते. आज्जी ची आई म्हणजे जीजीला देशी आषधांचे ज्ञान होते. आजी अश्या अत्यंत संपनन कुटुंबात लहानाची मोठी झाली. आजीला त्या काळीही पोहायला यायचे, ती सायकलही उत्तम चालवायची. घराच्या आवारात म्हणजे कॉलेज कॅम्पस मध्ये असणाऱ्या झाडांची तिथे येणाऱ्या पक्षांची तिला माहिती असायची. तिच्या कडूनच पक्षीवेड आमच्या बाबांकडे आले असावे असे मला वाटते. आज्जी अभ्यासातही हुशार होती, त्या काळी मॅट्रिक ला प्रथम श्रेणीत उत्तीर्णही झाली पण आण्णांचे म्हणजे आज्जीच्या वडिलांचे अकाली निधन झाले नी आज्जीचे शिक्षण मागे पडले. माहेरची श्रीमंती, आधुनिक वातावरण मागे सोडून सांगली सारख्या छोट्या गावात आज्जी लग्न करून आली.
आज्जीचे लग्न झाले तेंव्हा म्हणजे साधारण 1939 साली आजोबा दत्त आपटे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते बरोबरीने स्वातंत्र्य चलवळीतही सहभागी होते. स्वातंत्र्या नंतरच्या काळात ते राजकारणात, समाकारणात सक्रीय झाले परिणामी त्यांचे घराकडे लक्ष नसायचे. घरात सतत येणे जाणे असायचे, आज्जीचा सारा दिवस त्यात निघून जायचा. आज्जी चा विषय निघाला की “घरात रोज इतकी पाने झडत आणि आज्जी सगळ्यांचे न थकता करायची” हे वाक्य आजही ऐकायला मिळते. आज्जीने केलेल्या आदरातिथ्याच्या कहाण्यान पेंक्षा तिच्या इतर गुणांचे मला जास्त अप्रूप वाटते.
आज्जी कायम मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी तजवीज करून ठेवायची, अडी अडचणीला लागले तर पैश्याची सोय करून ठेवायची. तिचे हे व्यवहारी असणे मला जास्त भावते. आजोबांनी अनेक पुस्तकं लिहली, अनुवादीत केली. त्या सगळ्यातही आज्जीचा सहभाग असायचा. टिपण काढून ठेवणे, शुद्धलेखन तपासणे ह्या गोष्टी आज्जी आनंदाने करायची. आज्जीचे आणखी एक वेगळेपण म्हणजे तिचा देवावर विश्वास होता पण रोजची पूजा आणि वर्षातले चार महत्वाचे सण सोडून तिने कधीही उपास, तापास, व्रत, वैकल्य केली नाहीत. ह्याचे मला महत्व ह्यासाठी वाटते कारण पुढच्या पिढीला आपली श्रद्धा आपल्या मार्गाने व्यक्त करण्याची मुभा मिळाली. आज्जीचे गणित चांगले होते. माझी धाकटी आत्या शालेय मुलांच्या शिकवण्या घ्यायची. एकदा शिकवता शिकवता तिलाही एक प्रश्न सुटत नव्हता जो तिथेच असणाऱ्या आमच्या आज्जीने सहजगत्या सोडवून दाखवला.
माझ्या आठवणीतली आज्जी शरीराने तशी थकत चालली होती त्यामुळे नातवंडांना सांभाळणे, चार पदार्थ खाऊ घालण वगैरे गोष्टी अपेक्षे बाहेरच्या होत्या. आज्जीला एकूण पाच मुलं आणि नऊ नातवंडं. ह्या नऊ नातवडांत सात मुली तर दोनच मूलगे. आपटे कुटुंबात मुलींचे राज्य होते. आम्हा मुलीत मोठ्या आत्याची शिमूताई, माझी थोरली बहीण जाई आणि धाकट्या काकाची पूर्वा ह्या तिघी लहानपणी स्वभावाने शांत, सालस, हळव्या होत्या आणि म्हणूनच आज्जीच्या जवळच्या होत्या. एरवी आज्जी तशी स्वभावाने कडक होती. मला आठवतंय एकदा मी आणि माझी धाकटी चुलत बहीण सकाळी सकाळी पोहायला जायचे नाही म्हणून रडत होतो, आज्जी आपली पाठराखण करेल ह्या आशेने तिच्या मागे लपायला गेलो तर आज्जीने स्वतानेच आमची पोहायची बॅग भरायला घेतली. ती स्वता: उत्तम पोहणारी होती तर तिच्या नाती घाबरून मागे राहतात हे तिला रूचले नसावे.
आज्जी शेवट पर्यंत स्वताची सर्व कामे स्वतः करायची, संध्याकाळची भाकरी निगुतीने करायची. मी दहा वर्षांची असताना आज्जी गेली. ती गेल्यावर एक दिवस तिचे कपाट उघडले गेले त्यात एका कप्प्यात ठेवणीतल्या साड्या, एका कप्प्यात कलाकुसरीच्या ठेवणीतल्या वस्तू, स्टीलच्या डब्यात गुंडाळून ठेवलेल्या कोऱ्या करकरीत नोटा आणि तिच्या नावच्या मुदत ठेवीच्या पावत्या अश्या अनेक गोष्टी आढळल्या. तिची काटकसर, आर्थिक नियोजन हे सगळे वाखाणण्या सारखेच होते.
आपण जे काही असतो ना त्यावर आपल्या कुटुंबातील स्त्रियांची छाप कळत नकळत पडतेच आणि म्हणून मला आज्जीची नात असल्याचे समाधान वाटते.


