देशपांडे आज्जी

काही माणसं तुमच्या जगण्यात धुमकेतू सारखी येतात आणि गायबही होतात. अश्याच एक होत्या देशपांडे आज्जी. मी वीस एक वर्षांची असेन, त्यावेळी घरात आईचे एक आजारपण चालू होते. आईला विश्रांतीची गरज होती आणि मला काही त्यावेळी रोजचा स्वयंपाक येत नव्हता, त्यात घरात दवाखान्याच्या फेऱ्या, औषध -पाणी बघणे, सगळी बिलं सांभाळून ठेवणे वगैरे कामंही माझ्याकडे आली होती.

मग आम्ही स्वयंपाकाला मदत घ्यायचे ठरवले. आमच्या घराच्या समोर माझा दूरचा आतेभाऊ एकटाच रहायचा त्याने त्याच्याकडे स्वयंपाक करायला येणाऱ्या आज्जींची आणि माझी ओळख करून दिली आणि अश्यातर्हेने देशपांडे आज्जींचे आमच्या घरी येणे चालू झाले.

देशपांडे आज्जी चणीला अगदी लहानसर होत्या. पाचवारी साडी गोल गोल गुंडाळून त्यातला इवलासा पदर काढून दोन्ही खांद्यावरून घेऊन वावरायच्या. चंदेरी पातळ कुरळ्या केसांचा लहानसर आंबाडा बांधलेला असायचा. डोळ्यावर जाड भिंगाचा चस्मा आणि खांद्यावर चॉकलेटी रंगाची मोठी पिशवी अडकवलेली असायची. वयानुसार त्यांचे पायाचे दुखणें चालू झाले होते त्यामुळे त्या थोड्याशा लंगडत चालायच्या. आज्जींचा आवाज नाजूक होता आणि बोलणें अगदी मधाळ होते.

त्या सकाळी लवकर म्हणजे साडेसहा वाजताच स्वयंपाक करायला यायच्या. त्या येण्याआधीच आज्जीना शोधाशोध करायला लागू नये म्हणून मी सगळे जिन्नस काढून ओट्यावर  ठेवायचे. आज्जी फार सुंदर स्वयंपाक करायच्या. आज्जी मऊसर पोळ्या करायच्या, मला आवडतील अश्या कमी तिखट भाज्या करायच्या, चिंच गुळाची आमटी करायच्या. कधी दाणे भाजून त्याची कुटून भरड चटणी करून ठेवायच्या. रोज एक कोशिंबीर करायच्या. त्यांच्या हातची मुळ्याची लिंबू पिळून, दाण्याचे कूट घालून केलेली कोशिंबीर मला फार आवडायची. आज्जी कायम म्हणायच्या कमी सामानातही उत्तम स्वयंपाक करता येतो. त्यांनी खवा न घालता केलेला दुधी हलवाही अप्रतिम लागायचा.

देशपांडे आज्जीची कहाणी मला कायमच विचित्र दुःखद वाटायची.त्यांचे आणि त्यांच्या नवऱ्याचे दोघांचे स्वतचे घर होते. नवऱ्याच्या माघारी त्यांच्या लग्न झालेल्या मुलीने कागदपत्रांमध्ये काहीतरी फेरफार करून आज्जिना घराबाहेर काढले होते. आज्जी मग त्यांच्या मुलाकडे रहायला गेल्या. मुलगा, सून सुस्वभावी होते पण त्यांचे घर लहान होते, मुलाची घरची परिस्थिती बेताची होती. मुलावर आपले ओझे होतेय ह्या भावनेतून आज्जीनी मुलाला न सांगता एक दिवस त्याचे घर सोडले आणि त्यांच्या एका बहिणीच्या घरी रहायला गेल्या. आमच्याकडे आल्यावर एकदा त्यांनी त्यांची कहाणी मला सांगितली. मी आज्जीच्या आजू बाजूलाच असायचे, मला वाईट वाटायचे पण त्यांना काय मदत करावी हे काही मला कळत नव्हते. एक दिवस आज्जीनी एक फोन नंबर लीहलेला कागदाचा चुरगाळलेला कपटा माझ्या हातात दिला. म्हणाल्या, “हा माझ्या मुलाचा फोन नंबर, त्याला माझा ठावठिकाणा माहित नाही, तो काळजी करत असेल तर त्याला फोन करून मी ठीक आहे असे सांग.”   आज्जीना मी म्हणाले मी फोन लावून देते, तुम्ही स्वतः बोला. तर म्हणाल्या,” मी बोलायला लागले तर मला रडायला येईल, वर मी कोठे आहे हे त्याला कळू द्यायचे नाहीये, नाहीतर तो मला न्ह्यायला येईल.”  आज्जीचे हे अजब प्रेम का त्याग का आणखी काही मला समजत नव्हते. त्यात आमच्या घरातच इतकं काही चालू होतं की त्यावर फार विचार मी केला नाही. मी त्यांच्या मुलाला फोन केला आणि म्हणाले, “मी अमृता बोलतेय, आमच्या घरी सांगलीतच आज्जी स्वयंपाक करायला येत आहेत, त्या ठीक आहेत, त्यांच्या एका नातेवाईकाकडे राहत आहेत, तर तुम्ही त्यांची काळजी करू नका, त्यांना शोधतही बसू नका” हे ऐकून त्यांच्या मुलाचा आवाज कातर झाला. “तुम्ही कोठून बोलता” हे मला आज्जींचा मुलगा परत परत विचारत होता. ईकडे आज्जी काही बोलू नको अशी विनंती करत होत्या. गोंधळून जाऊन मी फोन ठेवून दिला. नंतर अनेक दिवस मला आजींच्या मुलाचा कातर आवाज आठवत रहायचा.

काही दिवसांनी आज्जींचे घरी येणे अचानक बंद झाले. त्यांनी सांगून ठेवले होते,” मी माझ्या एका बहीणीकडे, भिडे टँककडे (स्विमिंग पुल) जाणाऱ्या गल्लीत, पोपटी रंगाच्या बैठ्या घरात राहते. त्या एवढ्याश्या पत्त्यावर मी आज्जीना शोधत गेले. आज्जी आजारी होत्या, हॉल मध्ये हंतरलेल्या गादीवर बसून कोणीतरी दिलेला चहा थरथरत्या हातांनी पित होत्या. त्यांना नीट बोलता येत नव्हते. त्यांची बहीण उंच किरकिर्या आवाजात म्हणाली,” आता आज्जी काय कामाला येणार नाहीत, मुलाचे घर सोडून माझ्याकडे आली आणि अशी आजारी पडून राहिली.” मला घश्यात एकदम काहीतरी अडकल्या सारखे वाटायला लागले, थोडावेळ अजून थांबले असते तर मला रडायलाच आले असते. मी लगेच तिथून बाहेर पडले.

आज्जींचे येणे थांबले आणि आमच्या घरचे रूटीनही थोडे हलले. आज्जीना कॉफी आवडायची. त्यांचा स्वयंपाक झाल्यावर आम्ही दोघी कॉफी पित थोड्या गप्पा मारायचो की आज्जी परत पुढच्या कामाला जायला निघायच्या. आज्जींचे स्वतःचे दुःख मोठे होते तरी ते मागे टाकून आमच्या घरी येऊन फार प्रेमाने स्वयंपाक करायच्या. त्यांनी केलेल्या पदार्थात त्यांची माया उतरली आहे असे मला वाटायचे. त्यांच्या केलेल्या स्वयंपाकानी, पदार्थानी आमच्या आजारल्या, ओशाळलेल्या मनाला, शरीराला थोडी शांतता लाभायची.

मी अजूनही विचार करते “आज्जींसारखे स्वतःचे दुःख असताना ते मागे टाकून इतरांच्या दुःखावर फुंकर मारणे मला कधी जमेल का?” अजून तरी मला ह्याचे उत्तर मिळाले नाहीये…

Social Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top