एलिझाबेथ कोन मध्ये अडकलेली जेसी

#Healing Period

– सोमवारी सकाळी मी नाष्टा झाल्यावर स्वयंपाक घरात आवराआवर करत होते आणि प्रसाद बाहेर पेपर वाचत होता. जेसी त्याच्या शेजारी बसून तिची सकाळची आंघोळ करत होती म्हणजे अंग चाटत बसली होती. तिच्या “शी” च्या जागी जखम होऊन रक्त येत असल्याचे प्रसादला दिसले. आम्ही लगेच तिला harness घातला, तिच्या carrier मध्ये बसवले आणि डॉ. गोऱ्हे कडे न्हेले.

सोमवारची दवाखान्यात प्रचंड गर्दी होती. आमच्या आधी दोन husky, एक Rotweiller, दोन labrador जातीची कुत्री आणि तीन मन्या इतके जण नंबर लावून होते. जेसीच्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव बघता मी घाई करत होते. जेसीला बघून डॉकटर म्हणाले तिला anal gland infection झाले आहे.  म्हणजे बाहेरून जखमेवर ईलाज करायला हवा आणि आतून शरीरातील inflammation वर. डॉक्टरनी आधी antibiotics ची इंजेक्शन दिली मग potassium permanganate नी जखम साफ केली आणि dressing केले.  हे करताना जेसीच्या harness ला मी पकडून होते, एका assistant ने जाड ग्लोव्हज घालून तिचा चेहरा पकडला होता, दुसऱ्याने तिचे पाय पकडले होते तरी ती इतके हिसके देत होती की दोन वेळा डॉकटरच्या हातातून इंजेक्शन निसटले. तिच्या आवाजाने बाकीचे प्राणी हादरून गेले.  डॉकटरनी दिवसातून तीन वेळा जखमेची मलमपट्टी करायला आणि दोन वेळा antibiotics द्यायला सांगितले. तिला चार दिवस घरा बाहेर जाऊ द्यायचे नव्हते आणि जखम चाटू नये म्हणून गळ्यात कोन घालून ठेवायचा होता. हिचे तांडव बघता पुढे कसे हिला आपण आवरणार ही काळजीच होती.

घरी आल्यावर आधी घरच्या सगळ्या खिडक्या बंद केल्या. तिला carrier मधून बाहेर काढले, तिला घट्ट पकडुन तिच्या गळ्यात कोन घालून टाकला. कोन घातल्यावर जेसी फार कावरी बावरी झाली. तिच्या चालण्या, बागडण्या सगळ्यावर बंधने आली. मिश्यांच्या लांबी वरून मन्या जागेचा अंदाज घेतात. त्यांच्या शरीराच्या प्रमाणात त्यांच्या मिशा वाढत असतात त्यामुळे एखाद्या खिडकीतून, फटीतून आपण जाऊ शकू का हे त्यांना त्यांच्या मिश्यांमुळे कळते. इथे तर पूर्ण चेहराच कोन मध्ये अडकलेला होता. जेसी सारखे वेडे वाकडे पळायला लागली, कोन निघावा म्हणून कुठेतरी जाऊन मुद्दाम धडकायला लागली. तिला आवरता आवरता आमची कसरत चालू होती. वेळेवर औषध देणे, तिच्या जखमेची मलमपट्टी करणे , ती दरवाज्यातून बाहेर जाऊ नये म्हणून काम करता करता तिच्यावर लक्ष ठेवणे असे सगळे चालू होते.

ती एरवी रात्री बाहेर जाते किंवा आपापली झोपते पण आजारी असताना आमच्या जवळ येऊन झोपायला लागली मग आम्ही तिला आमच्या शेजारी तिचे तिचे पांघरूण घालून त्यावर झोपू दिले पण ती हलली की आमची पण झोप भंग व्हायची. जेसीला घरात शी शू करायला अजिबात आवडत नाही तरी बाहेर जाता येत नाही म्हंटल्यावर ती litter tray वापरायला लागली. त्याचा वास येऊ नये म्हणून मी tray साफ केल्यावर कापूर जाळायला सूरवात केली. Room freshener आम्ही वापरत नाही कारण त्याचा मांजरांना त्रास होतो असे वाचले होते. एक ना अनेक.. इतके करूनही एक दिवस मी आंघोळीला गेले असताना, तिच्या गळ्यात कोन असताना , तिने guest room च्या खिडकीत उडी मारून, नायलॉनची जाळी चावून, उचकटून काढली आणि ती बाहेर पळाली. प्रसाद काही निमित्ताने पार्किंगमध्येच गेला होता त्यामुळे तो तिला उचलून घरी आणू शकला.

असे सगळे करत, दवाखाने करत बाई साहेब आता बऱ्या होत आहेत. एकदा प्राणी घरी आला की लहान मुला सारखे सगळे त्याचे करावे लागते. प्राणी आपल्याला फार जीव लावतात. जेसी कोन घातला तरी आम्हाला तसेच येऊन अंग घासायची. मी दामटून ओषध प्यायला लावते म्हणून माझ्या पासून लांब रहायची पण लांबून माझ्या कडे बघून डोळे मीचकावून प्रेम व्यक्त करायची.

आपल्याला येऊन अंग घासणे, आपल्याकडे बघून डोळे मिचकावणे, आपण बोट समोर केले की नाक लावणे, जवळ येऊन बसणे ह्या मन्यांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती.

मला ह्या सगळ्याचा इतका ताण आला होता की मीच आजारी पडले. पण प्रेम ते प्रेम जेसी साठी कायपण 💚

Social Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top