
श्रीवर्धन मधील शेखाडी आणि खारगावं ह्या लगतच्या गावातून पायी चालत होते, स्वचछ रस्ते आणि सूबक घरे लक्ष वेधून घेत होते. शेखाडी गावची लोकसंख्या 940 घरात गॅस सिलेंडर आले आहेत पण पाणी अजून आले नाही, दूरच्या विहरीवरून बायका, मुलींना घागरी भरून पाणी आणावे लागते. काहींच्या घरात विहीर असली तरी विहरीला बहुतांश मचुळ पाणी असते. मर्यादित शेती आणि मासेमारीवर लोकांचा उदरनिर्वाह होतो, अगदी मोजके लोक पर्यटन पूरक व्यवसाय करतात. प्राथमिक शिक्षण गावात आहे पण माध्यमिक शिक्षणासाठी मुलांना गाव सोडावे लागते. गावातील बहुतेक तरुण मुलं मुली पुणे, मुंबईला शिक्षण, नोकरी साठी गेली आहेत मागे आहेत ते जास्त करून ज्येष्ठ नागरिक. कोकणी माणूस काबाड कश्ट करून मुलांना बाहेर पाठवतो कारण गावात उत्पादनाची साधने नाहीत. उमेदीच्या काळात middle East मध्ये उदरनिर्वाहासाठी जाण्याचे प्रमाणही इथे जास्त आहे. शेखाडी, खारगावं दोन्ही गावच्या हिंदू बहुल आणि मुस्लिम बहुल इलाक्यातून मी पायी फिरले. खारगावंचा सरपंच बोलता बोलता म्हणाला, ” तुमच्या पुण्यात काय वातावरण आहे माहित नाही पण आमच्याकडे आम्ही हिंदू मुस्लिम मिळून मिसळून राहतो, आमचे घरोब्याचे समंध आहेत, भांडण तंटे होत नाहीत. खारगावंला गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात पारितोषिक मिळाले आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानही लोकांनी यशस्वी रित्या राबवले. महिलांच्या पुढाकाराने गावात दारूबंदी केली आहे.
हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील घरे, त्यांची सजावट, पोशाख, आहार ह्यातला वेगळेपणा अगदी दिसून येतो पण ही विविधता आणि त्यातील एकता बघणे सुखकारक अनुभव आहे. हे सहज चालता चालता पाहिलेले निरीक्षण इथे मांडले तसे तर खूप काही लिहता येईल पण तूर्तास इतकेच 😊


