उदयपूर एक सुखद अनुभव

उदयपूर हे भारतातले पर्यटनासाठीचे  प्रसिद्ध ठिकाण आहे. अरवली पर्वत रांगांमध्ये वसवलेले हे शहर येथील मानवनिर्मित तलावांसाठी ओळखले जाते. तलावांशिवाय ऐतिहासिक किल्ले, राजवाडे, संग्रहालये, कलादालने, बागा, वास्तू कला, पारंपारीक सण, उत्सव आणि जत्रा ह्या सगळ्यांमुळे देशा परदेशातून पर्यटक उदयपूरकडे आकर्षित होतात.

उदयपूरचा इतिहास विलक्षण घडामोडीनी भरलेला आहे. मेवाड प्रांताची पूर्वीची राजधानी चित्तोड होती. चित्तोडवर मुघलांकडून वारंवार हलले व्हायचे. अकबराची महत्वाकांक्षा जाणून असणाऱ्या “उदयसिंह दुसरा” ह्याने चित्तोड सोडले आणि 1553 मध्ये उदयपुरला आपले बस्तान हलवले आणि उदयपुर हेच “मेवाड” च्या राजधानीचे शहर म्हणून वसवले. उदयसिंहने त्याचे राजगृह city palace बांधायला सुरवात केली आणि त्याच्या नंतरच्या राजांनी त्यात भर घातली.

उदयपूर शहरात फिरताना, राजपूत लोकांचे कलेवर असणारे नितांत प्रेम जागोजागी दिसून येते. मेवाड राजघराणे स्वतःला “सुर्यवंशी” म्हणजे सूर्याचे वंशज म्हणवून घेतात. बाप्पा रावळ हा मेवाड घराण्यातला पहिला राजा होता. राजस्थानात इतरत्र राजप्रमुखांना “राजे” म्हंटले जाते तर मेवाड प्रमुखाना “महाराणा” म्हंटले जाते. महाराणा म्हणजे सर्वश्रेष्ठ राजे जे कधी मुघलांसमोर झुकले नाहीत आणि ब्रिटिशांचा राज्य कारभारातील हस्तक्षेपही रोखू शकले. उदयपुरच्या लोकांना त्यांच्या इतिहासाचा फार अभिमान आहे. मारवाड म्हणजे जोधपूर, बिकानेर, जैसलमेरच्या राजपुतानी मुघलांशी हातमिळवणी केली होती पण मेवाड मात्र कायम मुघलांविरोधी प्राणपणाने लढले. मेवाडच्या प्रत्येक राजाने शहराचे सौदर्य वाढवण्यास हातभार लावला, अनेक वाडे, वास्तू आणि तलाव बांधले.

आम्ही ठरवून चार दिवस फक्त नी फक्त उदयपूर शहरात फिरलो. बरीचशी प्रेक्षणिय स्थळे उदयपुर शहराच्या जुन्या भागात आहेत त्यामुळे रिक्षाने फिरणे सोईस्कर आहे. पुण्याहून कनेक्टिंग फ्लाइटने उदयपूरला निघून हॉटेलवर  पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे पाच वाजले. आमचे हॉटेल चांदपोल भागात होते. जरा ताजेतवाने होऊन आम्ही बाहेर पडलो. एक गल्ली पलीकडेच, पिचोला तलावाला लागून असलेल्या गणगौर घाटावर आम्ही आरामात चालत गेलो. काही क्षण घाटावर शांतपणे घालवल्यावर आम्ही शेजारीच “बागोर की हवेली” मध्ये लोकनृत्याचा कार्यक्रम बघायला गेलो. बागोर की हवेली अठराव्या शतकात उदयपुरचा पंतप्रधान आमरचंद बडवा ह्याने बांधली. हवेलीचे रूपांतर सध्या वस्तु संग्रहालयात करण्यात आले आहे ज्याची देखभाल पश्चिम विभागीय सांस्कृतीक केंद्र करते. साडेसहा वाजता लोकनृत्याचा कार्यक्रम चालू झाला. राजस्थानी पारंपारीक नृत्याचे बारा प्रकार आहेत. कार्यक्रमात, गायन आणि वादनाचे काम पुरुषानी केले तर पारंपारीक पोषाख आणि साधन लेऊन स्त्रियानी नृत्य सादर केले. “लाल मेरी पत रखीयो बला झुले लालण” ह्या लोकप्रिय सूफी गाण्यावर तर कलाकरान बरोबर प्रेक्षकानीही ठेका धरला. राजस्थानी लोककलेच सादरीकरण बघणे हा आमच्यासाठी एक विलक्षण सुंदर अनुभव होता.

दुसऱ्या दिवशी आम्ही जगदीश मंदिर बघायला गेलो. शहरात फिरायचे ठरवल्याने आम्ही तीन चार दिवसांसाठी एक रिक्षा बुक केली होती. आमचा रिक्षा चालक सराफतने आम्हाला चांगली साथ दिली. जगदीश मंदिर शहराच्या केंद्रस्थानी आहे. हे प्रसिद्ध विष्णु मंदिर

१६५१ साली राजा जगत सिंहने बांधले. आकर्षक मूर्तिकाम आणि नक्षीकाम ही मंदिराची खासियत आहे. जगदीश मंदिराजवळच थोड्या अंतरावर सिटी पॅलेस आहे. सोळाव्या शतकात महाराणा उदयसिंह ह्यानी महाल बांधण्यास सुरवात केली. पुढे चारशे वर्षात मेवाड घराण्यातील प्रत्येक राजाने बांधकामात नव्याने भर घातली. सिटी पॅलेस राजस्थानी वास्तूकलेचा उत्तम नमूना आहे. सिटी पॅलेसचे बांधकाम ग्रॅनाईट आणि संगमरवरात केले आहे. संपूर्ण महालात लाकडावर, चांदीवर केलेले अद्भुत कोरीवकाम बघायला मिळते. रंगीत काचांवर केलेली कलाकुसर, भिंतीवरची चित्रे आपल्याला आकर्षित करतात तर वरच्या भव्य छतावर केलेले नक्षीकाम मोहवून टाकते. राजा राण्यांची स्वतंत्र दालनं, त्यांच्या चिजवस्तूंचे प्रदर्शन, सभामंडप हे सर्व बघायचे असेल तर पुरेसा वेळ दयवाच लागतो. महालात प्रवेश करण्याआधी तिकीट घेत असतानाच आपल्या बरोबर गाईड घेतला तर तो महालाची रंजतदार सफर घडवून आणतो. सिटी पॅलेस च्या बाहेरच फतेप्रकाश पॅलेस आहे इथली Crystal Gallery जगप्रसिद्ध आहे. महाराणा सज्जनसिंह ह्यानी परदेशातून मागवलेल्या काचेच्या वस्तूंचे हे संग्रहालय आहे. अतिशय सुंदर कोरीवकाम केलेल्या रंगीबेरंगी काचेच्या लहान मोठ्या वस्तु निरखणे अल्हादायक अनुभव आहे.

पिचोला तलावाच्या मध्यभागी बाधण्यात आलेला जगमंदिर पॅलेस हेही एक आकर्षक ठिकाण आहे ज्याची निर्मिती मेवाड घराण्यातील तीन राजानी अपापल्या कार्यकाळात केली. ह्या महालात शाही समारंभ, सोहळे, मेजवान्या आयोजित केल्या जात असत. पिचोला तलावात वसवलेला हा महाल चोहोबाजूनी बोटीतून बघताना वेगळाच आनंद मिळतो.

कारप्रेमींसाठी  Vintage Car Collection हा एक नजराणाच आहे. अगदी घोडा गाडी पासून सुरवात होत राजा महाराजांच्या वापरासाठी परदेशातून मागवलेल्या, इंग्रजानी भेट दिलेल्या गाड्यांचे प्रदर्शन बघण्यासारखे आहे.

सहेलियोकी बारी ही महाराणा संग्राम सिंह ह्याने त्याच्या मुलीच्या प्रेमाखातर निर्माण केलेली बागही पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. लढाऊ योद्धा महाराणा प्रतापसिंह ह्याच्या स्मृती प्रीत्यर्थ बांधलेले स्मारक आणि तिथले संग्रहालय मेवाडच्या साहसी,स्वाभिमानी राजांचा, योध्यानचा इतिहास समजून घ्यायला मदत करते.

राजस्थानी संगीत, साहित्य, नृत्य, पोशाख सगळ्या बद्दल इत्तंभूत माहिती हवी असेल तर लोक कला मंडळ हे कला संग्रहालय जरूर बघायचे. पश्चिम विभागातील म्हणजे महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, राजस्थान ह्या चार राज्यातील नागरी जीवनाची झलक बघायची असेल तर शिल्पग्रामला आवश्य भेट द्यायची.

उदयपुरमध्ये खरेदीची आवड असणाऱ्या लोकांची चंगळ होते इतक्या नानाविध वस्तु इथे मिळतात. खास राजस्थानी वस्तु हव्या असतील तर “हाती पोल” बाजारात खरेदी करायची. बांधणी, ब्लॉक प्रिंटचे ड्रेस मटेरियल, miniature paintings, दागिने, बांबू सिल्क / बनाना सिल्कच्या साड्या, लेदरच्या वस्तु असे काय काय दिसत असते. काही नाही तरी बजारात गेलेला पर्यटक विंडो शॉपिंग तरी करतोच करतो इतके ते वातावरण भुरळ पाडते.

जे खरेदी बाबत होते तेच खानपानाच्या बाबतीत होते इतकी खाद्य पदार्थांची विविधता आढळून येते. घेवर ही उदयपूरची प्रसिद्ध मिठाई आहे जी अतिशय मधुर असते. स्ट्रीट फूड मध्ये कांदा कचोरी आणि मिरची वडा प्रसिद्ध आहे. पारंपारीक जेवणात दाल बाटी, गटटे की सब्जी आणि कढी पकोडा ह्या पदार्थांचा आवर्जून आस्वाद घ्यायचा. मात्र खाताना वेळा बघायच्या, एका दिवशी सगळे खायला जायचे नाही. सकाळचा ब्रेकफास्ट साधा पण भरपेट ठेवायचा म्हणजे दीवसभरात फिरताना इकडचे तिकडचे खाल्ले तरी चालते.

उदयपुरची माणस बोलघेवडी आहेत, जाईल तिथे आपुलकीने चौकशी करतात. पुण्याचे त्यांना विषेश कौतुक आहे कारण राजस्थानच्या आताच्या पिढीतले अनेक तरुण IT industry मुळे पुण्यात बस्तान बसवून आहेत. तिकडचे कारागीरही त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू घेऊन प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यात येत असतात. उदयपुर एअरपोर्ट वर भेटलेला आमचा cab driver तर पूर्वी काही वर्षे पोटापाण्यासाठी सांगलीमध्ये रहायचा हे ऐकून तर मी चाट पडले होते. सांगली, मिरजेत जिथे जत्रा भरेल तिथे तो कुल्फी विकायला जायचा. म्हणजे माझ्या माहेरी घराशेजारी हा ईसम काम करत होता जो मला उदयपुरला भेटला. जग किती किती लहान आहे असे मला वाटून गेले. आमचा रिक्षा चालक सराफत आमच्या वेळेनुसार सर्वत्र आमच्या बरोबर यायचा.. शेवटच्या दिवशी आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरच्यांचे रोजे चालू होते त्यांच्या बरोबरच आमचेही संध्याकाळचे खानपान झाले.

उदयपुर शहर स्वच्छ आहे, रस्ते मोठाले आहेत. मार्च मध्ये अजून उन्हाचा चटका वाढायचा होता त्यामुळे हवेत एक सुकून होता. उदयपुर बघायचे तर वेळ काढायचा, धावत्या भेटीत नीट काही अनुभवले जात नाही.  रमत गमत आपल्याला हवे तसे फिरायचे, खरेदी करायची, लोकांशी गप्पा मारायच्या, गल्ल्या गल्ल्यातून नवे – जुने रस्ते, त्यांची नाव शोधत जायचे, वाटेत लागणाऱ्या तलावांवर रेंगाळत बसायचे, बोटीतून गिरक्या घ्यायच्या, लोकनृत्य  बघतांना त्यांच्यातले एक होऊन जायचे, रात्री दिव्यांच्या लखलखाटात दिपून गेलेले शहर हॉटेलच्या गच्चीतून बघायचे, शहराचे तलावात पडलेले प्रतिबिंब निरखत रहायचे आणि हा सगळा विलक्षण सुंदर अनुभव मनात साठवून परतायचे.

Social Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top