आठवणीतली बाग

सांगलीच्या जुन्या घरच्या किती किती सुंदर आठवणी आहेत. आमचे, डबल डेकर बस सारखे सरळ रेषेतले दोन मजली घर होते, भोवती मोठाली झाडं असणारी बाग होती. घरात शिरताना उजवीकडे भला मोठा वयाने थोरला जांभूळ ज्याचे फळ काळे, मोठे टपोरे होते. त्या इतके मधुर जांभळाचे फळ मी नंतर कोठे खाल्ले नाही. उन्हाळ्यात बादली भरून जांभळ निघायची जी गावभर वाटून व्हायची. घरच्यांनी तयार केलेली जांभळाची कलमंही अशीच कुठे कुठे गावभर रुजली. फळ धरलं की हमखास माकडांची झुंड कुठून तरी दणा दण उड्या मारत उगवायची, वाटेत दिसेल त्याला हुस्कावत आडदांडपणा करायची. माकडांचा गोंधळ बघून बागेत खेळणारी मनी आणि मनीची पिल्ल कावरी बावरी होऊन लपून बसत. वळवाच्या धबधब कोसळणार्‍या पावसाबरोबर जमिनीवर जांभळाचा बिछाना अंथरला जायचा.

दोन मजली घराला मागे आणि पुढे असे दोन जिने होते. पुढच्या जिन्यात जांभूळ तर मागच्या जिन्यात शेवगा होता, तो असाच बेफाम यायचा पोत्यानी, वाटून वाटून उरायचा. तासनतास बागेत बसणे खास करून जिन्यात बसणे मला फार आवडायचे. मी वाळलेल्या शेवग्याच्या शेंगा फोडत त्यातले बिया उडवत बसायचे, कधीतरी म्हातारीची शेंग मिळाली की गच्चीत जाऊन शेंग फोडून म्हातार्याना उडवत बसायचे. मी अगदी शाळकरी पोरं होते तेंव्हा झाडावर चढून पेरू काढायचे, विलायती चिंचा आकडीच्या काठीने पाडायचे. मैत्रिणी खेळायला घरी आल्या तरी आमचा मुक्काम बागेतच असायचा.

पपई, सिताफळ सगळी फळं झाडवरुन उतरवायची नाहीत हे आमचे ठरलेले असायचे. थोडी झाडावर पक्षांसाठी शिल्लक ठेवलेली असायची. बागेत बुलबुल बर्‍याचदा घरटी करायचे पण मनी आणि पिल्ल जशी घरी आली तसे बागेतले पक्ष्यांचे घरटी करणे बंद झाले. आमच्या घरात, फार जुने दोन दगडी उखळ होते ते काढून आम्ही बागेत इकडे तिकडे ठेवून दिले होते, त्यात पाणी भरून आम्ही ठेवायचो. पक्षी तलावात अंघोळीला यावे तसे यायचे, शाही स्नान करून जायचे.

मुख्य दारात स्वागताला जाईचा मांडव, पाठीमागच्या दारात जुईचा मांडम आणि मध्यभागी रातराणी खुलून यायची. सदाफुली सदा फुललेली असायची तर मे फ्लॉवर त्याच्या त्याच्या दिवसात येऊन निघून जायचे. गोकर्ण आणि कृष्ण कमळाचे वेलं कुंपणावर पसरलेले असायचे. गुलाब, चाफा, जास्वंद अशी किती तरी फुल बागेत रूजली होती. रात्री रातराणीचा वास दरवळायचा. मी उन्हाळ्यात रात्री बागेत खुर्ची टाकून डायरी लिहित बसायचे, बाहेर इतके गार वारे असायचे की थोड्या वेळाने गारठून जायला व्हायचे. बागेमुळे घरात इतका गारवा होता की भर उन्हाळ्यातही घरात थंड वाटायचे. झोपायच्या आधी बागेत चंद्राच्या सोबतीन बसायचं काहीतरी वाचायचं, लिहायचं आणि मग तृप्त होऊन झोपायचे.

नंतर जुन्या घराभोवती खूप वर्दळ, गर्दी, आवाज वाढले. मग आई बाबांनी ते घर बदलले. नवीन घर अजूनच मोठे आहे, मी नव्या घरावर खूप खुश झाले होते, वाटले की जुने घर आपण सहज विसरलो, पण नाही जुने उषःकाल अजूनही स्वप्नात येते. एकदा मी वाट चुकून जुन्या घरापाशी जाऊन पोहोचले होते, मुख्य दार उघडुन बागेत गेले, घरात शिरत होते इतक्यात तिथे राहणारे नवे लोक म्हणाले, “अग तुझे काही नाही राहिले आता इथे” आणि मला खडबडून जाग आली .

Social Share

1 thought on “आठवणीतली बाग”

  1. These memories are everending. Every one owns such. Myself has many but weaving them in to words is an art.
    It is better to write them when they are afresh.

    Amruta keep writing. So I can feel your childhood.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top