
शेजारी पाजारी, इतर कोठे गेले की TV serials डोळ्यासमोर येतात आणि नकळत एक निराशा मनात येऊन जाते. किती दिवस तेच तेच चित्र दाखवणारेत हे लोक असे वाटून जाते.
ह्या सीरिअल्स मध्ये स्त्रिया तरी कश्या दाखवल्या जातात तर सतत दागिने घालून, सजून धजून घरची कामं करणाऱ्या. खरया आयुष्यात असं कोण करत बर? बाकी काही करेल न करेल पण मालिकेतली स्त्री ही पूजा, सण, वार, परंपरा जपणारीच असते बरका. पेशाने पोलीस असली तरी घरी डोक्यावर पदर घेऊन पूजा करणारी स्त्री दाखवणे म्हणजे हद्दच झाली. अगदी देव मानणारी किंवा श्रद्धा, विश्वास सगळं असणारी स्त्री असली तरी ती माणूस आहे किनई ती पण नोकरी करून दमत असते किंवा वेळेच्या मर्यादा तिला असतात, असले सोवळे ओवळे करायला वेळही तिला नसतो. पण serial मधल्या बाईला तो वेळ मिळतो कारण निर्मात्यांना सतत रूढी परंपरांना शरण गेलेली स्त्रीचं दाखवायची असते, तशी स्त्री कशी आदर्श हे खपवायचे असते. मैत्रिणी बरोबर रमणारी, प्रवास करणारी, कुटुंबा व्यतिरिक्तं स्वतः चे जग असलेली, आनंदी स्त्री ह्यांना दाखवायचीही नसते. एक असते सोशिक खाली मान घालून अन्याय सहन करण्यात आनंद मानणारी तर दुसरी असते सतत कारस्थान करणारी. खरं तर ठरवून ही कोणी सोशिक राहू शकत नाही कधी तरी माणूस कंटाळतो, त्याला त्रास जाणवायला लागला की तो त्यातून बाहेर पडायचे मार्ग बघतो पण मग TV वरच्या मालिका काय सांगतात तर स्त्रिया ह्या शोषिक असतात किंवा त्यांनी तसेच असावे. नाही का? आता खलनायिका बघू , मालिकेत दाखवतात तसे 24 तास दुसऱ्याचे वाईट कोणीही चिंतू शकत नाही. एखादी त्रासदायक कटकटी व्यक्ती असली तरी ती माणूस असते, तिच्याकडे किल्ली दिलेल्या रोबो सारख्या फकत नकारात्मक भावनाच कश्या असतील हो? प्रेम, माया स्वताच्या मुला बाळांसाठी तरी असत असेलच ना? मग स्त्रीला इतके black and white category मध्ये का दाखवले जात असेल?
पुरुष ही कसे दाखवतात तर सतत पैसा, बँक बॅलन्स, जमीन जूमला ह्यात अडकलेले, घरात मकख चेहऱ्याने वावरणारे. का बरं ? पुरुषाची ताकद तो किती पैसा मिळवतो ह्यातच असते असे narrative pass करायचे असते म्हणून का? हसणारे, मुला बाळात रमणारे, दंगा मस्ती करणारे पुरुष किंवा दुःखात बायकोचा आधार घेणारे पुरुष मालिकेमध्ये कधीच दाखवले जात नाहीत. भावनाप्रधान पुरुष दाखवला जात नाही कारण पुरुषाने भावनिक होणे कमी पणाचे समजले जाते.
ह्या मालिकांमधली कुटुंब कशी दाखवतात ? तर प्रचंड सत्ताकेंद्री. घरातली एक दोन वयाने ज्येष्ठ लोक घराचे नियम, परंपरा आखून देतात आणि बाकी सगळे मेढरांसारखे मागे मागे जात असतात. ह्या कुटुंबातली एक व्यक्ती कधी इतरापेक्षा वेगळ्या आवडी निवडी असणारी, स्वतंत्र मत असणारी, त्या प्रमाणे वागणारी दाखवली जात नाही. कारण कुटुंब म्हणजे एकाने सांगायचे आणि बाकीच्यांनी माना डोलवायच्या हेच चित्र मालिकांना विकायचे असते.
ह्या सगळ्याला वैतागलेला सधन वर्ग कधीच OTT कडे वळला आहे. त्यामुळे TV हा वैयक्तिक प्रश्न राहिला नाही तो तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी आपल्या पुरता सोडवला आहे. तरी संध्याकाळी कुटुंबाने एकत्रितपणे टीव्ही बघणारा फार मोठा वर्ग समाजात अस्तित्वात आहे आणि ह्या मालिकांमधल्या नकारात्मकतेचा परिणाम लोकांवर होत असतो म्हणून कौटुंबिक मालिकांचा दर्जा सुधारायला हवा. चॅनल वाले, निर्माते, कलाकार सगळेच जण एकत्रित पणे काळाची पावले मागे टाकताना दिसतात म्हणून ह्या सगळ्याचा निषेध करावासा वाटतो.

