सह्याचला आणि मी एक प्रेमकहाणी

मी अलीकडेच माधव गाडगीळ ह्यांनी लिहलेले “सह्याचला आणि मी एक प्रेमकहाणी” हे पुस्तक वाचून काढले. पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करताना, माधव गाडगीळ ह्यांनी भारतातील दऱ्या, खोऱ्या, जंगले अक्षरशः पिंजून काढली. Indian Institute of Sciences मध्ये कार्यरत असताना त्यांनी स्वतंत्रपणे संशोधक म्हणून काम केले तसेच भारत सरकारच्या वेगवेगळ्या समित्यांसाठी अभ्यासक, मार्गदर्शक म्हणून काम केले. पर्यावरण रक्षणासाठी, निसर्ग संवर्धनासाठी कायदे आणि धोरणं ठरवण्याच्या प्रक्रियेत सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन केले.

ह्या पुस्तकात माधव गाडगीळ ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या वनरक्षण संकल्पने वर प्रकाश टाकतात. त्या संधर्भात असलेले कायदे, धोरणं ह्यांची समीक्षा करतात. भारतातील जैवविविधतेचा त्यांनी केलेला अभ्यास आणि त्याच्या ह्रासाची कारणे स्पष्ट करतात आणि मुख्य म्हणजे सरकारने लोकसहभागातून करावयाच्या उपाय योजना समोर ठेवतात.

हे पुस्तक पर्यावरणशास्त्र अभ्यासकांसाठी तर महत्वाचे आहेच पण बरोबरीने पर्यावरणाबाबत आस्था असणाऱ्या प्रत्येक सामान्य व्यक्तीने वाचावे असे आहे. पुस्तकं वाचत असताना पर्यावरणा बद्दलचा आपला दृष्टीकोन जास्तीत जास्त व्यापक होत जातो. 

गाडगीळ म्हणतात वनांचे संरक्षण करताना, निसर्गाशी जोडलेल्या स्थानिकांचा/ आदिवासी जनतेचा/ गावकऱ्यांचा आधी विचार व्हायला हवा. परंतु प्रत्यक्षात, सरकारे, त्यांची धोरणे, वनखाते, शहरी लोक हे स्थानिकांविरोधी भूमिका घेताना दिसतात.  जसे की,

1) आपण आणि आपली सरकारे, पूर्वापार वनांवर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांना नैसर्गिक हानी साठी दोषी ठरवतो. खरे बघायला गेले तर स्थानिकांचा वनांवर प्राथमिक हक्क आहे. त्यांचा उदरनिर्वाह कायम स्वरुपी वनांवर अवलंबून असल्या कारणाने वन टिकवून ठेवण्याची “निकड” “ईच्छा” स्थानिकांना जास्त असते. नैसर्गिक साधन संपत्ती जपून वापरण्याकडे त्यांचा कल असतो हे लक्षात घ्यायला हवे.

ह्याउलट , व्यापारी लोकांना उदा. खाणव्यापारी/ कागद कारखानदार ह्यांना वनसंपत्ती नष्ट होण्याची फिकीर नसते. हे व्यापारी Investor असतात. एका ठिकाणची  संसाधने नष्ट झाली तर ते दुसऱ्या ठिकाणी/ दुसऱ्या धंद्यात पैसे लावू शकतात.

2)  वन्यजिवाच्या संरक्षणास प्राथमिकता देताना स्थानिक लोकांना, गावकऱ्यांना दुय्यम वागवले जाते. हत्ती, रानडुकरे हे बऱ्याचदा वनक्षेत्राच्या बाहेर फिरतात त्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान होते. शेतकऱ्याने प्राण्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर शेतकरीच दोषी ठरवला जातो. बिबट्या, वाघांच्या हलल्यात स्थानिकांचे बळी जातात पण हलले आटोकात आणण्याचे प्रयत्न केले जात नाहीत.

3) आपल्यासाठी विकास म्हणजे मोठे प्रकल्प असतात. औष्णिक ऊर्जा प्रकल्प, खाणी, सॉफ्ट ड्रिंक चे किंवा रासायनिक खतांचे कारखाने असे उद्योग निसर्गास पर्यायाने जनजीवनास अपायकारक असतात. म्हणून शाश्वत विकासाचा आग्रह धरणे, पर्यावरण पूरक व्यवसाय उभारणीस मदत करणे गरजेचे आहे. धनाढ्य व्यवसायिकांच्या विनाशकारी प्रकल्पान ऐवजी पर्यावरण पूरक लघू उद्योग उभे राहतील, स्थानिक लोक स्वयंपूर्ण होतील ह्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

शहरी लोकांनी आणखी एक दोन गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.  1) कमी वेळात वारेमाप कोसळणाऱ्या पावसासाठी आपण ग्लोबल वॉर्मिग चे कारण पुढे करतो आणि आपली जबाबदारी झटकतो. परंतु शहरातले वाढते काँक्रीटीकरण हे वाढत्या पावसास कारणीभूत आहे हे लक्षात घ्यायला हवे. सिमेंट कांक्रिटचे रस्ते, महामार्ग ह्यांनी जमीन तापून हवा वर चढते. ह्या Local warming चा विचार करायला हवा.

2) शहरी लोकांसाठी वन्य पशुपक्षांचे संवर्धन जास्त महत्वाचे असते पण कृमी, कीटक, गोगलगाई, मासे ह्या नद्यांच्या परीसंस्थाचे महत्वही लक्षात घ्यायला हवे.

3) एका पावसात तुंबणारी शहरे नको असतील तर जमिनी पासून उंचावरचे महामार्ग, पाणथळ जागा बुजवून होणारी बांधकाम, डोंगर उतरावरची वृक्षतोड थांबवायला हवी.

अश्या रीतीने आपल्या पर्यावरणाच्या आस्थेचे लोकाभिमूख आणि विज्ञानभिमूक विचारधारेत रूपांतर केले तर त्याचे मोल जास्त आहे असे मला वाटते.

~अमृता आपटे

Social Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top