
मिता कारच्या पाठीमागच्या सिटवर डोळे मिटून, पाठीमागे डोकं टेकून बसली होती. एकदम खट्ट खकळ्ळ असा आवाज झाला, तिने डोळे उघडले पण डोळ्यापुढे अंधारी येत होती. आपण उलटे, पालटे होत खाली फेकलो गेलो आहोत आणि चारी बाजूला पाणी आहे असे काहीसे तिला जाणवले. तिने जमेल तसे हात पाय मारायला सुरवात केली पण काही उपयोग झाला नाही, नाका तोंडात पाणी जात ती खोल खोल पाण्यात बुडत होती. मिता दचकून जागी झाली, जोराने श्वास घेऊ लागली. नदीचा पूल कोसळून आपण पाण्यात पडल्याचे स्वप्न तिला पडले होते. तिने स्वताला सावरायचा प्रयत्न केला पण तिला झोप काही लागत नव्हती. ह्या कुशीवरुन त्या कुशीवर वळत ती अस्वस्थपणे पडून होती. डोक्यात सतराशे साठ विचार येत होते. मध्यरात्री पडलेल्या ह्या स्वप्नाचा अर्थ ती लावू बघत होती.
तिला आठवले लहानपणीचे दिवस. मिता लहान असताना उन्हाळी सुट्टीत गावातल्या नदीवर पोहायला शिकायला जायची. दर मे महिन्यात मिताचे आई वडील उन्हाळी शिबिरात मिताचे नाव घालायचे. मिताला पाण्याची, नदीच्या खोलीची प्रचंड भिती वाटायची. सुट्टीत, मस्त आरामात घरी उशीरापर्यंत झोपावे असे तिला वाटायचे पण मिताची आई मिताला लवकर उठवून नदीवर घेऊन जायची. दररोज मिता ‘पोहायला जायचे नाही’ म्हणून रडारड करायची. मिताच्या घरात सगळ्यांना पोहायला यायचे त्यामुळे मितानेही पोहायला शिकावे अशी सगळ्यांची इच्छा होती. मिताची सख्खी, चुलत भावंडं तिला घाबरी मनी म्हणून चिडवायचे.
मिताच्या शिबिरातले लोक पोहायला धरणावर जमत असत. शिबिरातले मोठे दादालोक मिताच्या पाठीला डबा न बांधताच तिला धरणाच्या जलाशयात फेकून द्यायचे. धरणाची दारे बर्याचदा उघडी असायची, त्या दारातून पलीकडच्या पात्रात धबधब्या सारखे जोरात पाणी फेकले जायचे. मिताला, आपण पोहता पोहता त्या दारातून पलीकडच्या विस्तीर्ण पात्रात वाहून जाऊ अशी कायम भिती वाटायची.
शिबिरातली सगळी मुलं धरणाच्या जलाशयात बरेच दूर अंतरावर असणार्या जॅकवेल पर्यंत पोहत जायची आणि परत यायची. मिता सगळ्यांमागून जाताना वेडे वाकडे हातपाय मारायची मध्येच गटांगळ्या खायची. पाण्यात खाली बघायची तिला भिती वाटायची म्हणून ती मान पाण्यावर ठेवून उभे पोहायची. खरे कसे पोहायचे हे तिला कोणी शिकवलेच नव्हते. वेडेवाकडे हात मारून, उभ पोहून दमून जायची. पाण्यातून बाहेर आली की पोटात पाणी गेल्याने तिला उलट्या व्हायच्या. पोहताना मध्येच आपण बुडून जाऊ, आपण मरून जाऊ असे काय काय तिला वाटायचे. मिता “मला पोहायचे नाही” म्हणत रडून रडून दमून जायची पण तिला समजून घेणारे कोणी नव्हते.
मिताची भिती जात नव्हती, ती पोहायला शिकत नव्हती त्यामुळे मिताच्या घरचे तिच्यावर नाराज असायचे. ते तिला रागवायचे, शिक्षा करायचे. पुढे अनेक वर्ष पोहण्याचे शिबीर, मिताची रडारड आणि तिचे भितीचे चक्र तसेच चालू राहिले. मिता माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर कोठे तिच्या घरच्यांनी त्यांचा हट्ट सोडून दिला आणि पोहण्यापासून मिताला मुक्ती मिळाली. पण ह्या अगदी लहानपणीच्या सततच्या आनुभवातून मिताचे मन भितीच्या चक्रात अडकले होते. उन्हाळी सुट्टी म्हणजे भिती असे तिच्या अंतर्मनात कुठेतरी खोल रुजले होते. माध्यमिक शाळेपासून तिला वार्षिक परीक्षेची आणि पाठोपाठ येणार्या निकालाची भिती वाटायला लागली होती.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षी, मिताने परत एकदा पोहायला शिकायचा प्रयत्न केला. घराजवळच रानडे स्विमिंग पुल होता तिथे तिने पोहण्याचे रीतसर प्रशिक्षण घ्यायला चालू केले पण तिथेही तिची घोर निराशा झाली. “पाण्याशी झटापट करणे म्हणजे पोहणे असेल तर त्या वाटेला आपण परत न गेलेलेच बरे” असे म्हणत मिताने तो विषय तिथेच थांबवून टाकला पण पाण्याची भिती तिची तशीच राहिली. मिता, मित्र मैत्रिणींबरोबर समुद्रावर फिरायला जायची तेंव्हा काठावरच रेंगाळायची. इतर सर्व जण पोहायचा आनंद घेत असताना मिताला मात्र वेगाने धावत येणार्या मोठाल्या लाटांची भिती वाटायची. प्रवासात बस मधून जाताना, गाडी पूलावरुन निघाली की मिता घट्ट डोळे बंद करून घ्यायची, नदीचे मोठाले पात्र तिला परत परत भयचकीत करायचे.
इतक्यातच, मिताने तिच्या धावपळीच्या नोकरीमधून ब्रेक घेतला होता. आराम करू, झोपा काढू, स्वतला वेळ देऊ असे तिने ठरवले होते. मिताचे थकलेले शरीर, मन आता कुठे विसावू बघत होते तेव्हढ्यात दुष्ट स्वप्नानी तिची झोप पार घालवून टाकली होती. ह्या पाण्याच्या भितीचे काहीतरी कारायला हवे असे तिला वाटायला लागले. तिच्या समुपदेक मैत्रिणी कडून तिने Memory Reframing बद्दल ऐकले होते. Memory Reframing म्हणजे डोळे मिटून शांत बसायचे आणि त्रास देणारा भूतकाळातला प्रसंग आठवायचा, तो प्रसंग आत्ता घडतो आहे अशी कल्पना करायची, त्या कल्पनेत मनाची होणारी तगमग अनुभवायची, बरोबरीने येणारे विचार, भावना ह्यांचे निरीक्षण करायचे. मनाची तगमग काही काळाने शांत झाली की एक pause घ्यायचा आणि जुन्या भूतकाळात घडलेल्या प्रसंगाच्या जागी नवीन सकारात्मक प्रसंग कल्पनेनं उभा करायचा. मिताने MEMORY Reframing ची प्रॅक्टिस केली. ती सलग दोन चार दिवस ध्यान लावून बसायची. नदीच्या पाण्यात बुडत असतानाचा प्रसंग आठवून तिला सुरवातीला कापरे भरायचे पण हळूहळू भावना स्थिर होत गेल्या तसे तिने आपण रमत गमत पोहत असल्याची कल्पना करायला सुरवात केली. ह्या पद्धतीने जुन्या भितीच्या आठवणी पुसायला मिताला बरीच मदत झाली.
मिताने त्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष पद्धतशिरपणे पोहण्याचे प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. कॉलनी मधल्या जलतरण तलावात पोहायला जायचे ठरवले. पहिले काही दिवस मिता फक्त तलावाच्या बाजूने चालत तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करायची. क्लोरीनच्या पाण्याचा वास तिला अस्वस्थ करायचा, नवीन तास चालू झाल्याचा मोठा गजर वाजला की तिच्या पोटात गोळा यायचा. पोहायला जायची वेळ झाली की घरातून निघताना भितीने तिला पोट बिघडल्यासारखे वाटायचे. काही तरी कारण काढून पोहायला सुट्टी घ्यावी असे तिला वाटत राहायचे. मिता ‘भितीला सामोरे जायचेच’ म्हणत घरातून बाहेर पडू म्हणायची पण गलबलून तिला रडावेसे वाटायचे. स्वताला फार जबरदस्ती करता येणार नाही हे तिला कळून चुकले. विचार सकारात्मक ठेवले तरी आठवणीतल्या भावना अचानक वर उफाळून यायच्या. मिताने मग स्वतच्या कलाने घ्यायचे ठरवले.
मिताने तिचे प्रशिक्षक शिंदे सर ह्यांना तिच्या पाण्याच्या भिती विषयी कल्पना दिली होती. प्रशिक्षणाची सुरवात water walking ने झाली. शॉवर घेऊन पाण्यात उतरल्यावर अंगात थंडीने हूडहुडी भरायची पण चार फुटातल्या पाण्यात चालताना शरीराला पाण्याशी जुळवून घ्यायला मदत व्हायची आणि पायातली ताकद वाढायलाही मदत व्हायची. चार दिवसांनी मिताने Breathing टेक्निक शिकायला सुरवात केली. पाण्यात उभे राहून मोठा श्वास घ्यायचा आणि पाण्याखाली जाऊन अलगद सोडायचा. मिताला पहिल्यांदा अवघड वाटले पण नंतर जमायला लागले. Floating Board हातात घेऊन पाण्यावर नुसते पालथे पडणे, मग काही दिवस फक्त पाय मारणे, कधी पाय स्थिर ठेवून फक्त हाताने पाणी मागे टाकत पुढे जाणे असे मिताचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण चालू होते. तरी तिला शिकायला तसा वेळ लागत होता. मधून मधून तिची बैचेनी वाढायची. आतापर्यंत पोहायला शिकायचा हा तिचा चौथा प्रयत्न होता. आता आले नाही तर काय? हा प्रश्न तिला छ्ळायचा.
मिता पोहायला येणार्या इतर छोट्या मुलांकडे बघायची. घाबरून रडणार्या बारक्या मुलांमध्ये मिता स्वताला बघायची. अनेक चार पाच वर्षांची मुलं मासोळी सारखे पाण्यात खाली वर करायची, खेळायची त्याचं मिताला कौतूक वाटायच तर मुलांबरोबरीने त्यांना सोबत करत पाण्यात उतरणार्या त्यांच्या आया बघून मिताला हेवा वाटायचा, असा आधार आपल्याला नव्हता ह्याची खंत तिच्या मनात येऊन जायची.
शिंदे सर मिताच्या कलाने घ्यायचे. एक दोनदा सूचना देऊन ते निघून जायचे त्यामुळे मिताला स्वतचे स्वता चुका करत शिकायची मुभा मिळायची. चुका करताना, त्या स्विकारताना, त्यातून शिकताना मिता रमायला लागली. मिताची लहानपणी ब्रेस्ट स्ट्रोकशी ओळख झाली होती आताही तिने त्याच पद्धतीने पोहायला सुरवात केली. संथ गतीने हात पाय मारत, पाणी मागे टाकत पुढे जाताना मिता स्वतच्या हालचाली निरखायला लागली. मिताला अलगद तरंगताना आतून हलके हलके वाटायचे मात्र हेच खोल पाण्याच्या दिशेने जाताना पायातली ताकद गळून गेल्यासारखे व्हायचे. वाटेत पोहत दुसरे कोणी आले की मिता गोंधळून जायची, तिची लय तुटायची, भिती एकदम तिला ग्रासून टाकायची, हालचाली वरचा ताबा सुटला की तिच्या नाका तोंडात पाणी जायचे, मिता वेगाने धडपडत कडेच्या भिंतीला पकडायला जायची.
खोल पाण्याची सवय करून घ्यायचा शेवटचा महत्वाचा टप्पा मिताला पार करायचा होता. मिताने आत्मविश्वास वाढावा म्हणून रात्री झोपताना स्वतच्या पोहण्या संधर्भात काही छोटीशी सकारात्मक विधानं (positive affirmations) मनात म्हणायला सुरवात केली. रोज पोहताना उथळ पाण्यातून खोल पाण्यात जाताना स्वतच्या भावना स्थिर ठेवायला सुरवात केली. काही दिवसानी मिता ह्या टोका पासून त्या टोकापर्यंत आरामात पोहायला लागली. सरावाने तिचा स्टॅमिनाही वाढला. तलावावर येणार्या ओळखीच्या लोकांपैकी कोणी तिचे कौतुक केले की ती खुश होत होती. एका मोठ्या भितीला तिने मागे टाकले होते. स्वताला दिलेले चॅलेंज तिने पूर्ण केले होते. तिचा आत्मविश्वास वाढला होता. तिला पाण्यात आता आरामशिर वाटायला लागले होते, मजा यायला लागली होती. पोहताना स्वता पालिकडे ती बघू शकत होती. मान वर केल्यावर वरती दिसणारे शुभ्र आकाश, पाण्यावर पडणारी सूर्याची तिरपी किरणे, तलावाच्या भिंती वरुन ये जा करणारी मांजर, पाण्याखाली श्वास सोडताना होणारे बुडबुडे, तलावाच्या आकाशी रंगाच्या टाइल्स आणि त्याने दिसणारे निळेशार पाणी अश्या अनेक गोष्टी आता ती रोज पोहताना डोळ्यात सामावून घ्यायची. आता पोहणे हा तिच्यासाठी फक्त व्यायाम उरला नव्हता तर मेहनतीमुळे गवसलेला आनंदाचा झरा बनला होता.


Very well written piece on overcoming deeply seated fears systematically. Loved it.