जिवाची मुंबई

जिवाची मुंबई –

एखादे शहर अनुभवायचे तर पर्यटन स्थळांव्यतिरिक्त तिथली माणसं, त्यांची भाषा, वागणं, पोशाख, खाद्य संस्कृती निरखावी लागते. बाजूचा निसर्ग अनुभवावा लागतो, शहर घडत असताना उभारली गेलेली शिल्पं – त्यांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. पुण्यात अनेक वर्ष राहत असल्याने त्याचा काना कोपरा पिंजून झाला होता. मुंबईचे मात्र कामाच्या निमित्ताने होईल तितकेच ओझरते दर्शन व्हायचे. South Mumbai ला फिरायचे प्रसादच्या आणि माझ्या फार मनात होते. गणपतीची धामधूम संपल्या नंतर आणि नवरात्रीची चालू होण्या पूर्वी आठवड्यातले मधले दिवस हेरून आम्ही मुंबईला जायचे ठरवले. प्रगती एक्स्प्रेसच्या विस्ता डोम बोगिमधून मुंबई CST पर्यंतचा प्रवास केला.  फक्त South Mumbai च बघायचे असल्याने फिरायला जवळ पडावे म्हणून फोर्ट area मधलेच हॉटेल बुक केले होते आणि त्यामुळे नंतरचे सलग तीन दिवस आजूबाजूला चालत फिरणे सोपे गेले.

Gate way of India बघताना डोळ्यासमोर “ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी इंगलंडला रवाना होत असल्याचे” चित्र समोर तरळले. ताज हॉटेलच्या रुपात “जमशेदजींचे स्वप्न” समोर दिसले. इतकेच कशाला Brand Stand वर फिरताना शाहरुखचे घर दिसले तसेच त्याच्या समोर असणारी वस्ती पण दिसली आणि covid काळातली कुठेशी वाचलेली बातमी आठवली “पूर्ण शहर ठप्प होते, वस्तीतले लोकं बेरोजगार होते तेंव्हा सहा सात महिने  ह्या शेजाऱ्यांना रोजच्या रोज मन्नत मधून जेवणाचे डबे यायचे”. प्रत्येक ठिकाणी असे संधर्भाने काहीतरी आठवायचे आणि  तिथेच रेंगाळले जायचे, वाटायचे अजून जरा थांबू आणखी डोळ्यात साठवू .

मुंबई हे व्यवसायाच्या निमित्ताने भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीसाठी दळणळणाच्या दृष्टीने सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाण होते.  नंतरही ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार होताना मुंबईचे स्थान अढळ  राहिले आणि अर्थातच ह्या शहराच्या विकासाचा पाया ब्रिटिश काळात रोवला गेला. CST छत्रपती शिवाजी टर्मिनस तेंव्हाच बांधले गेले. पंचम जॉर्जच्या स्वागता साठी Gateway of India ची कमान उभारली गेली. Asiatic Library , Brihanmumbai Municipal Corporation  ह्या नावाजलेल्या ईमारतींव्यतिरिक्त ही अनेक ब्रिटिश कालीन इमारती  South Mumbai मध्ये जागो जागी दिसतात.  पांढऱ्या, दुधाळ किंवा विटकरी रंगातल्या भव्य आणि दणकट ईमारती म्हणजे सौदर्य शास्त्राचा उत्तम नमूना. त्या ईमारतीवर असणारी रचनाही अत्यंत कलात्मक आणि मोहक की प्रत्येकाचे बारकावे टिपून घ्यावेत.

Fort भागात व्यवसायिक कार्यालये, महाविद्यालये जास्त दिसली. कामा साठी येणारी गर्दी दिवसभर लोकलने CST ह्या शेवटच्या स्टॉप वर येऊन थडकत असते. रात्री साडे आठ नंतर मात्र ईथे एकदम शुकशुकाट जाणवतो. असे शांत मुंबई काही वेगळेच भासते. आमच्या हॉटेलच्या अजुबाजूला आणि नंतर आख्या South Mumbai मध्येच मला  सर्वत्र मांजरं दिसत होती, टिव्हीवर बघितलेल्या turkey देशात आलो की  काय वाटावे इतकी  मांजरं. इथल्या लोकांचे  मांजरांवर विशेष प्रेम आहे असे दिसले. त्यांच्या साठी जागोजागी catfood, पाणी ठेवलेले, पुठ्ठ्याची घरं तयार करून ठेवलेली बघून ह्या शहराचा आणखी एक संवेदनशील कोपरा दिसून आला.

South Mumbai मला राहण्यासाठी कायम अवाक्या बाहेरची तरी स्वप्नवत वाटते. म्हणजे marine drive च्या आसपास राहता येणं शक्य नसलं तरी “इथे एक घर पाहिजे राव” हे स्वप्न मात्र प्रत्येकाच्या मनात झळकून जातं. ईथे जमलेले प्रेमिक ईतक्या सहजपणे प्रेमाची देवघेव करत असतात ना की माझ्यासारख्या पुणेरी मनाला ह्या प्रेमिकांचा फारच्या फारच हेवा वाटतो.

मुंबईची संस्कृती म्हणजे विविधतेत असणारी एकता. हाजी आली दर्गा आहे शेजारीच महालक्ष्मीचे मंदिर आहे. बाहेरून येणारे भाविक दोन्हीकडे जातात, मन्नत/ आशीर्वाद मागतात. मिनी स्कर्ट  मध्ये वावरणाऱ्या मुली दिसतात तसेच  वेगवेगळ्या रंगातले, कलाकुसर केलेले अबाया परिधान केलेल्या मुली दिसतात.  पंचम पुरीवाल्या कडे गर्दी असेल तितकीच गर्दी शेजारच्या “खिमा पाव” गाडी भोवती असते.

मुम्बई मध्ये विविध प्रकारचे अन्न पदार्थ त्यांच्या खासम खास चविसहीत अतिशय माफक दरात मिळतात. कपड्यांच्या बाबतीतही तेच, अतिशय स्वस्त, वैविध्य पूर्ण आणि टिकाऊ कपडे सर्वत्र मिळतात. मला खरेदीची अशी भुरळ पडत नाही पण कुलाबा मार्केट मधून चालताना एक दोन शर्ट पोतडीत जमा झालेच. अजून एक कौतुक म्हणजे ईथल्या हॉटेलात, दुकानात सर्वत्र तुम्हाला अगत्याची वागणूक मिळते. मी दुकानं बघत होते, प्रत्येक दुकानाच्या नावाच्या पाट्याही वेगवेगळ्या ढंगाच्या दिसल्या. सर्व दुकानांच्या पाट्यांवर दुकानाचा पूर्ण पत्ता लिहलेला दिसत होता त्यामुळे चालताना मॅप मध्ये न बघताही तुम्ही नेमके कोठे आहात हे कळू शकते. हे पाट्यांवर पत्ते लिहणे खरेतर अलीकडे दुर्मिळ झाले आहे म्हणून मला आपले अप्रूप वाटले.

इथली नव्याने बांधलेली हॉटेल आणि दुकानं बघायची. मुंबई मध्ये जागा महाग मग मर्यादीत जागेचा पुरेपूर वापर केलेला सर्वत्र आढळतो. पांढऱ्या रंगाचा वापर, कमीत कमी फर्निचर आणि आरश्यांचा वापर ह्यामुळे लहान जागाही  comfortable वाटायला लागतात. मला वाटते की architecture च्या विद्यार्यानी आखी मुंबई पालथी घालावी. नव्या, जुन्या सर्व वैविध्यपूर्ण बांधकामाचा अभ्यास करावा.

फिरताना जाणवलेली गोष्ट म्हणजे लहान विक्रेते, टॅक्सीवाले GPay ऐवजी कॅश घेणे पसंत करतात. पुण्यात Gpay ची इतकी सवय झाली आहे की पैश्याच्या रुपात व्यवहार जरा गैरसोयीचे वाटले पण छोट्या विक्रेत्यांना संध्याकाळी घरी जाताना a/c मधल्या balance पेक्षा खिशात खुळखुळणारी नोटा, नाणी आधार देतात हेही लक्षात आले.

एकुणातच मुंबईला स्वतःची गती आहे, तीची लय एकदा सापडली की इथे वावरणारा माणूसही आपोआप “स्मार्ट” होऊन जातो.

तरी हे देखणे शहर मला शापित वाटते. ब्रिटिशा नंतर अनेक राज्यकर्त्यांनी इथे राज्य केले, पैसा कमावला पण अक्षम्य दूर्लक्ष  केले.  जागांच्या वाढत्या किंमती, प्रदूषित हवा आणि गर्दीने हे शहर कोलमडते आहे ज्याला सावरण्याची फार गरज आहे.

Social Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top