
सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास, कष्ट सोसण्याची तयारी ठेवल्यास आणि संयम बाळगल्यास अंतिम विजय साध्य होतो ह्यावर गांधीजींचा विश्वास होता. द. आफ्रिकेत काळ्या कायद्याविरोधात लढताना गांधीजीनी पहिल्यांदा सत्याग्रहाच्या मार्गाचा वापर केला. प्रतिस्पर्ध्याशी प्रतिकार करताना, आपली योजना आधीच जाहीर करून समोरासमोर वाटाघाटीची लढाई करणे, त्याचे होणारे परीणाम भोगण्याची तयारी ठेवणे ह्या सृजनशिल मार्गाचा गांधीजीनी शोध लावला. सत्याग्रहाचा मार्ग सत्यावर आधारीत, अहिंसक, समजायला आणि अवलंब करायला सोपा असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय झाला.
गांधीजींनी अहिंसेचे तत्व लोकांमध्ये रुजवले. ‘अविवेकी विचारातून सूड बुद्धी निर्माण होते आणि त्याचे हिंसेत रूपांतर होते. दोन्ही बाजू एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्या तर मूळ मुद्दा , ध्येय मागे पडते आणि द्वेषाच्या भरात सगळ्यांचीच हार होते. हिंसेतून क्रूरतेला, हुकुमशाही वृत्तीला उत्तेजन मिळते जे समाजासाठी घातक आहे’ हे गांधीजीनी जाणले होते. हिंसात्मक कृतीपेक्षा अहिंसा पाळण्यासाठी अधिक सामर्थ्य लागते असे गांधीजींचे मत होते. व्यक्तीगत पराक्रम करण्यापेक्षा सुमहाचा पराक्रम जागवणे गांधीजींना महत्वाचे वाटायचे. त्यांच्या शब्दाखातर, स्वातंत्र्यांसाठी लोकं मरण पत्करायला तयार होत असत. मृत्यूला ताठ मानेने सामोरे जाण्यासाठी अंगात खरी निडरता असावी लागते आणि त्याची प्रेरणा लोकाना गांधीजींकडे बघून मिळत असे.
गांधीजीनी सर्व जनतेला बरोबर घेऊन, त्यांच्यातील अज्ञान दूर करत, सृजनशील कृतींची बांधणी करत इंग्रजान विरोधातला लढा उभा केला. लोकांमध्ये जाऊन, त्यांचे प्रश्न समजून घेत, प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना सक्षम करत मग नजाकतीने त्यांच्यात बदल पेरावेत ह्यावर गांधीजींचा भर होता. सामाजिक काम आणि राजकारण एकत्र पुढे नहयावे असे त्यांना वाटत असे. चंपारण्य मधील शेतकऱ्याच्या प्रश्नांपासून सुरवात करत त्यांनी उदाहरण घालून दिले. लोकांचे, प्रांतांचे, मजुरांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आखा देश त्यांनी पिंजून काढला. गांधीजीना मोठा जनाधार होता कारण त्यांनी स्वताला समाजाशी एकरूप करून घेतले होते, लोककल्याणातच त्यांना स्वतचे कल्याण वाटत असे. गांधीजीना समाजाची नाळ पक्की कळली होती. सामान्य जनतेला स्वातंत्र्य लढ्यात सामावून घ्यायचे तर त्यांना सहज सुलभ अश्या कृतींचा आराखडा घालून दिला पाहिजे हे त्यांनी जाणले होते. सूतकताई, परदेशी कपड्यांची होळी, साप्ताहिक लेखन, विरोधी प्रचार अश्या प्रकारचा कृतीतून भारतीय समाज स्वातंत्र्य लढयाशी जोडला गेला.
स्वातंत्र्य पूर्व काळात समाज जातीपातीच्या भेदात पोखरला गेलेला होता. समाजाला एकसंध करण्यासाठी गांधीजीनी जातीभेदाच्या मुद्द्याला हात घातला. अस्पृश्यता निवारणासाठी गांधीजीनी काम चालू केले तेंव्हा त्यांना हिंदुत्ववादी धर्मवेड्या लोकांच्या द्वेषाला सामोरे जावे लागले. तरी गांधीजी स्वतच्या मतावर आणि कृतीवर ठाम राहिले. स्वातंत्र्य केवळ मूठभर अभिजनांसाठी नसून ते बहूजनांसाठीही असलं पाहिजे हा गांधीजींचा आग्रह होता. बहूजनांच्या आकांक्षाना चेतना देत, स्वातंत्र्य लढयाच्या केंद्रस्थानी आणण्याचे मोठे काम गांधीजिनी केले. हिंसक कृतीतून, मूठभर लोकांच्या सहभागातून मिळणारे स्वातंत्र्य गांधीजीना नको होते. सर्व तळागाळातील लोकांचे परिवर्तन होऊन स्वतसाठी, स्वातंत्र्यासाठी त्यांनी कणखरपणे उभे रहावे असे गांधीजीना वाटत असे.
स्त्री पुरुष समानतेचे तत्व गांधीजिनी कायम पाळले. ऑलिव्ह श्रेनर ह्या लेखिकेशी गांधीजींचे मैत्रीपूर्ण समांध होते. समकालीन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी स्त्रियांशी ते आदराने वागत किंबहुना गांधीजींच्या प्रेरणेमुळेच चूल आणि मूल इथेच अडकलेल्या स्त्रिया प्रथम बाहेर पडल्या आणि स्वतंत्र भारतासाठी पुढे आल्या. द. आफ्रिकेत असताना, गांधीजीनी कस्तुरबाना सार्वजनिक कामात सहभागी करून घेतले. भारतात आल्यावर असहकार चळवळीत स्वत कस्तुरबा सामील झाल्याने अनेक महिलाना त्यातून प्रेरणा मिळाली. पुढे कस्तुरबा, गांधीजीशिवायही स्वतंत्रपणे एकेक प्रश्न घेऊन लढा उभा करत. राजकोटच्या जुलमी राजवटी विरोधी कस्तुरबानी केलेले आंदोलन लखणीय ठरले होते.
गांधीजींची धर्माची स्वतची अशी एक व्याख्या होती. अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घेणे म्हणजे हिंदू धर्म असे ते मानत असत. हिंदू धर्मावर त्यांचे प्रेम होते मात्र वेदप्रामाण्य त्यांनी मानले नाही आणि अस्पृश्यतेला त्यांनी कायमच विरोध केला. गांधीजी रामाची उपासना करत, त्यांच्या जगण्यात प्रार्थनेला महत्व होते पण मूर्तिपूजा त्यांना अमान्य होती, धर्माच्या खुणा अंगावर लेण्यास त्यांचा विरोध होता. ईश्वर म्हणजे माणसातील सत्य, प्रेम आणि विवेकबुद्धी हयाना घातलेली साद असे ते मानत. ईतर धर्माकडेही सम्यक दृष्टीने बघावे असे त्यांना वाटत असे.
गांधीजींकडे क्लेश सोसण्याची अभूतपूर्व ताकद होती. विरोधकांच्या विचारात परिवर्तन व्हावे ह्यासाठी त्यांनी अनेक वेळ उपोषणाचा अवलंब केला. हा जननेता जेंव्हा जेंव्हा सामाजिक , राजकीय सुधारणांसाठी आपले प्राण पणास लावत असे तेंव्हा व्यवस्थेवर, शासनावर दडपण येत असे परिणामी वाटाघाटीना सुरवात होत असे. फाळणीनंतर भारतात ठिकठिकाणी दंगली उसळल्या तेंव्हा अराजकता थांबावी म्हणून शांततेसाठी गांधीजीनी त्यांच्या आयुष्यातले शेवटचे उपोषण केले. गांधीजींच्या शब्दाला वजन होते, किंमत होती ती त्यांच्या जगण्यातून आली होती. गांधीजींचे म्हणणे लोक ऐकत कारण गांधीजीनी कायमच आधी केले नि मग सांगितले ह्यावर भर दिला.
स्वतचे विचार पडताळून बघणे त्यावर मंथन करणे गांधीजीना आवडत असे. एखाद्या कठीण प्रसंगात मनातली घालमेल, त्यातले द्वन्द्व पडताळून बघत गेले की परीस्थितीची, स्वतच्या क्षमतांची स्पष्टता येत जाते असे गांधीजी म्हणत असत. आत्मपरीक्षणातून मिळणाऱ्या साक्षातकारात गांधीजीना आनंद मिळत असे.
गांधीजी कायमच स्वतंत्र मतांचा आदर करत त्यामुळेच त्यांच्याभोवती अनेक शिकलेले, कर्तृत्ववान, उच्च विद्याविभूषित लोकही जमा होत. गांधीजींच्या प्रेमबुद्धी आणि क्षमाशीलतेमुळे भारतात, भारताबाहेरील , शतृपक्षातील विरोधी विचारांची माणसेही आपला विरोध मावळून गांधीजीनचे अनुयायी बनत.
गांधीजीनी सरसकट इंग्रजाना शत्रू मानले नाही किंबहुना तुटलेले राजकीय संबंधही संवादाने परत जोडता येतात ह्यावर त्यांचा विश्वास होता. गांधीजींच्या ह्या स्वभावमुळेच त्यांना इंग्रजांशी वाटाघाटी करून प्रश्न मार्गी लावत येत असत. गांधीजींचे नेतृत्व भारतीय जनतेने मानले होते आणि इंग्रजानीही कबूल केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा हा मुख्य सेनापती नंतरही स्वतंत्र्यचे श्रेय स्वत:कडे न घेता देशभर उसळलेले धार्मिक दंगे शांत करत पाई फिरत राहिला. गांधीजींचे कार्य,विचार अमर आहे.
गांधीजींचा खून केला तरी ते मरत नाहीत कारण ती फक्त एक व्यक्ती नाही, गांधीजींवर टीका केली तरी दंगा धोपा होत नाही कारण गांधीजी अस्मितेचे प्रतिक नाहीत तर गांधीजी ही एक अलौकिक विचारधारा आहे हे जे समजून घेतात ते माणूस म्हणून उन्नत होतात. ज्याना गांधीजी समजत नाहीत, समजून घ्यायचे नाहीत त्यांच्या बद्दल काही म्हणायचे नाही.


