
पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळीं आम्ही सगळे “आपटे नातेवाईक” एकाच कॉलनी मध्ये रहायचो. अख्या आपटे कुटुंबात बाबा, सखे, चुलत काका सगळ्यांना प्रत्येकी दोन दोन मुली होत्या त्यामुळे कुटुंबात मुलींचेच साम्राज्य असायचे. सगळ्या बहिणी फार उद्योगी होत्या. शाळकरी वयात कधी गच्चीवर मुद्दाम चूल पेटवून स्वयंपाक करणे, पोहायला जाणे, सायकल ट्रीपला जाणे, होळी साठी घरोघरी जाऊन लाकडे गोळा करून होळी करणे, मुलींचे गणपती मंडळ बसवणे, रात्र रात्र गणपती बघायला म्हणून फिरायला जाणे असले काहीतरी उद्योग बहिणीना हवे असायचे. बर आपटे कुटुंबात मुली म्हणून वेगळे वाढवणे, जपणे हा काही प्रकार नव्हता त्यामुळे मुली फार बिनधास्त असायच्या.
तर एके वर्षी आमच्या बाबांनी सगळ्या बहिणीना Jumanji चित्रपट बघायला न्हेले होते. त्या वयात तो चित्रपट इतका आवडला होता की पुढे अनेक दिवस गप्पांमध्ये Jumanji चा विषय असायचा. दरवर्षी, आम्ही मुलीं आमचा स्वतंत्र असा पाच दिवसांचा गणपती आमच्या दादाकाकांच्या बंगल्यात बसवत असू. त्या वर्षीच्या गणपती मंडळात Jumanji चित्रपटावर आधारीत देखावा सादर करायचे आम्ही ठरवले. सगळ्या कामाला लागल्या. प्रत्येकी पन्नास पन्नास रुपये जमा केले, घरातून शाली गोळा केल्या, मोठ्या बहिणीनी कुठून तरी जाऊन पारंब्या, फांद्या आणल्या. दादाकाकांच्या बंगल्यात शोभेचे कारंजे वगैरे बरेच सामान होते त्याचा उपयोग करुन घेतला. एका काकूकडे आमच्या मंडळासाठी प्रसाद तयार करायची जबाबदारी दिली. असे करत करत गणपती बसला, मंडळ तयार झाले, शेजार पाजारची मुलं, मुली रांगा लावून आमचे मंडळ बघायला यायला लागली.
दादाकाकांच्या बंगल्यात जिथे आमचे मंडळ बसवले होते ते घर होते दोन मजली. दोन मजले चढून वरती गेले की तिसऱ्या मजल्यावर जिन्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना गच्ची होती. दोन्ही बाजूंच्या गच्चीच्या मध्यभागी जो पॅसेज होता तिथे आम्ही गणपती बसवला होता.
दुसऱ्या मजल्या पासूनचा जिना आम्ही वरून शाली बांधून बंद करून टाकला आणि गुहा तयार केली. गुहा रहस्यमय वाटावी म्हणून पायात वाळलेली वेडी वाकडी लाकडे टाकून ठेवली. मधूनच छोटे मिणमिणते दिवे लावले. मंडळ बघायला आलेल्या प्रत्येक मुलाला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गुहेतून वाकून वर तिसऱ्या मजल्यापर्यंत जावे लागे. गुहेतून वर जाताना दोन मजल्यांच्या मध्ये एक लोखंडी किरकिर वाजणारा दरवाजा होता तो बाजूला करूनच वर जावे लागे. आलेल्या मुला/ मुलीने गणपतीचे दर्शन घेतले की त्याला/ तिला साखर खोबऱ्याचा प्रसाद दिला जाई. मी पडद्यामागे लपून एका छोट्या सिंथेसायझर वर हॉरर म्युझिक वाजवत बसलेले असायचे. आमच्या मोठ्या बहिणी पैकी कोणी तरी, आलेल्या मुलास फासे टाकून खेळ खेळायला सांगायचे. फासे कसेही पडले तरी परत जाताना आलेल्या मुलाला/मुलीला वाटेत कोण भेटणार हे आम्ही आधीच ठरवलेले असायचे. सिंह/ राक्षस/ चेटकीण ह्यापैकी कोणी तरी भेटणार हे ठरलेले असायचे. येणारा प्रत्येक जण, “कोण पण येऊदेत, काय घाबरत नाही” म्हणत जिना उतरायला लागायचा. तो मुलगा/ मुलगी जिना उतरताना परत एकदा वाटेत किरकिर करणार्या दरवाज्या पर्यंत पोहोचला/पोहोचली की दारामागे माझी मोठी बहीण जाई ठरलेला पोशाख करून लपून बसलेली असायची ती एकदम समोर यायची . बहीण, चेहर्यावर मुखवटा, अंगावर शाल, मागे लांब मोठे केस सोडलेले, चेहऱ्या समोर लहान टॉर्च धरलेला अश्या आवतारात समोर आली की टॉर्चच्या प्रकाशात तिच्या मुखवट्याचे मोठे लाल डोळे चमकायचे. आलेले मुलं घाबरत, रडत, धडपडत, देवाचे नाव घेत जिना उतरून निघून जायचे. गंमत म्हणजे मुलं घाबरायची तरी परत परत तो अनुभव घ्यायला रांगा लावून मंडळात यायची, बरोबर त्यांच्या शेजारच्या चिल्या पिल्ल्याना घेऊन यायची. आम्ही फार फार धमाल केली त्या वर्षी.
गणपती उत्सवाच्या दिवसात आम्हाला जेवण, खाण, अभ्यास कशाचे भान नसायचे. दादाकाकांची किंवा पद्मा काकुची आम्ही मुली गोंधळ घालतो म्हणून कधी तक्रार नसायची. मागे वळून बघितले तर मला ह्याचे कौतुकच वाटते. ईतर पालकांनी सुद्धा “मुली दिवसभर गायब असतात” ह्याची कधी चिंता केली नाही त्यामुळे फार मजेचे दिवस अनुभवायला आम्हाला मिळाले.
– अमृता आपटे


