
मागच्या खरेदी मध्ये “अनसूयाबाई आणि मी” हे पुरुषोत्तम काळे ह्यांनी त्यांच्या पत्नी अनसूयाबाईना समोर ठेवून लिहलेले आत्मचरित्र हाती पडले. व्यवसायाने कंत्राटदार असणारे पुरुषोत्तमराव त्यांच्या राजकारणात सक्रीय असलेल्या पत्नी अनसूयाबाई ह्यान बरोबरच्या सहजीवनाबद्दल, त्यांच्या कारकिर्दीबद्दल खुलासेवार लिहतात जे वाचणे अत्यंत रोचक आहे.
पुरुषोत्तम काळे अनसूयाबाईंना पहिल्यांदा पदवीचे शिक्षण घेत असताना फर्ग्यूसन कॉलेज मध्ये भेटले. पुढे कॉलेजच्या मासिकासाठी काम करताना त्यांची ओळख वाढली, ओळखीचे रूपांतर प्रेमविवाहात झाले. 1916 मध्ये उभयंता विवाहबद्ध झाले. लग्नानंतर पुरुषोत्तम काळेनी नोकरी न करता व्यवसायात उतरायचा निर्णय घेतला तर अनसूयाबाई समाजकारणात सक्रिय झाल्या. नंतरच्या काळात गांधीजींच्या आव्हानाला साद देत अनसूया बाई स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या. स्वातंत्र्य चळवळी पाठोपाठ काँग्रेसच्या राजकारणात सामिल झाल्या. खरे तर पुरुषोत्तम काळेना स्वताला राजकारणात रस होता पण त्यांच्या तोतरेपणामुळे आणि घरच्या आर्थिक जबाबदारी मुळे त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे टाळल्याचे ते नमूद करतात. त्यांनी घर, घराची आर्थिक जबाबदारी स्वीकारली तर बाईना घराबाहेर समाजकारणात, राजकारणात सक्रीय होण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. तो काळ बघता ही गोष्ट नवलाची होती. पण ह्या नवरा बायकोच्या नात्यात खरया अर्थाने समानता होती, एकमेकांप्रती आदर होता आणि विश्वास होता.
स्वातंत्र्यपूर्व काळात अनसूया बाई कायदे मंडळाच्या सदस्य होत्या, फाशी शिक्षा निवारण समितीचे कामही त्यांनी पाहिले. कामगार चळवळी मध्ये सहभागी झाल्या, राष्ट्रीय महिला परिषदेच्या अध्यक्ष म्हणून काम बघताना संतती नियमना सारख्या त्या काळी स्फोटक ठरलेल्या विषयाला त्यांनी हात घातला. बाई विचाराने पुरोगामी, त्या काळच्या धार्मिक रूढीना मागे टाकून विज्ञानाची कास धरणाऱ्या होत्या परीणामी सहकार्यांचा रोष त्यांना पत्करावा लागे. पुरुषोत्तम काळेंचा बाईना पाठिंबा असला तरी राजकारणासारख्या पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात बाई एकहाती तडफेने काम करत. त्याना पुरूष सहकार्यांकडून कधी साथ मिळे तर कधी विरोध होई. कधी डावलले जाई पण बाईंची चिकाटी सगळ्यांना पुरून उरे. बाई खमक्या, बोलायला फटकळ , घेतल्या निर्णयापासून विचलित न होणाऱ्या परिणामी राजकारणातील त्यांच्या प्रगतीत अडथळे येत असे श्री. काळेना वाटत असे. बाईंनी स्वताच्या उन्नती साठी high command च्या मर्जीत राहणे वगैरे कधी मानले नाही. 1956 साली वयाच्या साठाव्या वर्षी बाई लोकसभेच्या निवडणुकीत उतरल्या आणि निवडून आल्या. लोकसभेत त्यांनी संतती नियमनाचा विषय लावून धरला, सेक्यूलर स्टेटची कल्पना साध्य होण्यासाठी स्वतंत्र social welfare खाते असावे ही मागणी त्यांनी लावून धरली.
बाई राजकारणात सक्रिय असल्याने पुरुषोत्तम काळे आणि अनसूया बाईना बऱ्याचदा वेगवेगळ्या शहरात स्वतंत्र रहावे लागे पण त्यामुळे त्यांच्या नात्यात काही कमी झाले नाही. लग्नाच्या सुरवातीच्या काळात बाईना मानसिक आजाराने ग्रासले होते त्याकाळी मानसिक आजार म्हणजे “वेड लागले” असेच बघितले जाई पण श्री. काळेनी पत्नीच्या उपचारासाठी बऱ्याच खस्ता खाल्ल्या. काळे एकेठिकाणी नमूद करतात की “दोघांचे स्वभाव वेगळे होते पण त्यांच्यातल्या शरीरिक ओढीने त्यांचे नाते तगून राहिले असावे.” समाधानी वैवाहिक नात्यासाठी शरिर सुखाचे महत्व, प्राधान्य माहित असणे त्याकाळी ते उघडपणे मान्य करणे ह्यात मला पुरुषोत्तम काळे ह्यांचा धाडसीपणा आणि प्रांजळपणा जाणवतो. चार मुलांच्या लागोपाठच्या जन्मा नंतर बाईंच्या तब्येतीसाठी, दोघांच्या नात्यासाठी श्री. काळेनी संतती नियमन करण्याचा निर्णय घेतला, नुसता निर्णय घेतला नाही तर स्वताची पुरुष नसबंदी करून घेतली. त्या काळी संतती नियमनच दुर्मिळ होते मग पुरुष नसबंदी सारखे दहा लाखात एखादे उदाहरण दिसे पण काळे कायम काळाच्या पुढे चालणारे होते. त्यांनी बायकोला अगदी शेवट पर्यंत साथ दिली, बायकोच्या शेवटच्या आजारात सेवा केली. बायकोच्या पश्चात तिच्या प्रेमाखातर तिच्या स्मृतींना स्मरून आत्मचरित्र लिहले. श्रीयूत काळें सारखे पुरुष आजही विरळा आहेत.
मी स्वतला नशीबवान समजते की माझा जन्म अश्या महाराष्ट्रात झाला जिथे काळे पतीपत्नी सारख्या अनेक स्त्री पुरुषांनी समाज सुधारणेची बिजं पेरली ज्याची फळं आजच्या पिढीपर्यंत पोहोचली आहेत.

