
मी सांगली सारख्या लहान शहरात वाढले. त्यावेळी प्रत्येक ज्ञातीमध्ये स्वताची वेगळी अशी स्वयंपाकाची, खाण्या पिण्याची पद्धत जपली जात असे. आता, पुण्यासारख्या शहरात मला सर्वजण साधारण एकसारख्या पद्धतीने स्वयंपाक करतात असे वाटते उदा. तांदुळ पिठीचे उकडीचे मोदक. असो.
सांगायची आठवण म्हणजे माझी एक लहान गटापासुनची घट्ट मैत्रीण होती ती होती मराठा, मी दिवस दिवस तिच्या घरी असायचे. तिच्या घरचे पदार्थ मला फार आवडायचे. दर संकष्टीला मैत्रिणीची आई कणकेचे उकडीचे मोदक तयार करायची आणि मला ते फार आवडायचे. माझ्या घरी मला तांदूळ पिठीचे उकडीचे मोदक खाऊन माहित होते पण मैत्रिणीच्या घरचे कणकेचे मोदकही मला आवडायचे. आमच्या घरी मुगाची पातळ उसळ केली जायची तर मैत्रिणीकडे घरचा कांदा लसूण मसाला घातलेली कोरडी उसळ असायची. बरोबर थोडस आंबट दही आणि ट्टम फुगलेली भाकरी खायला मजा यायची।
माझ्या नात्या गोत्यात मऊ लुसलुशीत पुरण पोळीचे कौतुक असायचे तर मैत्रीणीच्या घरी पुरणपोळी मधले पुरण अगोड आणि कोरडे असायचे तेही मला फार आवडायचे. रोजच्या पोळीला तव्यावर तेल आमच्या घरी आम्ही कधी लावायचो नाही, पण मैत्रिणीकडे तेल लावून खरपूस पोळी भाजली जायची. तिच्याकडेच चहा पोळी मी पहिल्यांदा खाल्ली. आमच्याकडे खुसखुशीत चकलीचे कौतुक तर मैत्रिणीकडे भरीव आणि कडक चकली असायची जी मला जाम आवडायची. कडाकण्या नावाचा एक पदार्थ तिच्याकडे केला जायचा त्यातल्या गोड कडाकण्या मला फार आवडायच्या.
तर असे असायचे माझ्या पिढीतली पोरं स्वतच्या घरी कमी पण शेजारा पाजाऱ्यांकडे खाऊन पिऊन मोठी व्हायची.


