
विसाव्या शतकाच्या मध्यात, मानसशास्त्रात पालकत्व ह्या विषयावर स्वतंत्रपणे अभ्यासाला सुरवात झाली. व्यक्तीचे वर्तन, मानसिक आरोग्य समजून घेताना त्याचे लहानपणीचे अनुभव, पालकांची मुलांना वाढवण्याची पद्धत ह्याचा अभ्यास व्हायला लागला. अभ्यासात असे समोर आले की शारिरीक गरजांप्रमाणेच प्रेम, काळजी, विश्वास ह्या मुलांच्या पालकांकडून मूलभूत मानसिक गरजा असतात. आई वडिलांच्या वागण्यातून मुल ‘त्याच्याप्रती’ आई वडिलांच्या काय भावना आहेत हे जोखत असते आणि त्यातून स्व प्रतिमा तयार करत असते. अश्या तर्हेने पालक, मुलाशी ज्या पद्धतीने वागतात त्यावरून मुल स्वतबद्दलची मतं, भावना, धारणा तयार करते आणि त्यावरच त्याचे वर्तन आधारलेले असते.
मुलांच्या जडणघडणी मध्ये त्यांचे आई वडिलांशी असणारे नाते महत्वाचे असते कारण हे नातेच मुलांच्या भाविष्यातील नात्यांचा पाया असते. आई वडिलांशी असणार्या नात्याची प्रतिकृतीच मुल त्याच्या भविष्यातील नात्यात तयार करत असते.
पालकांकडून टीका झेलणार्या मुलांना स्वताबदल न्युंनगंड वाटायला लागतो. जर पालक अति काळजी करणारे असतील तर मुलं परावलंबी बनतात आणि जर पालक मुलांकडून अवास्तव अपेक्षा करणारे असतील तर पालकांच्या जादाच्या अपेक्षाना पुरून उरताना मुलं स्वतमध्ये अपूर्णत्वाची भावना घेऊन वावरायला लागतात. म्हणून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकत्वामध्ये सकारात्मक संवाद, मार्गदर्शन, माफक अपेक्षा आणि प्रोत्साहन ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात.
मूल हे मूल आहे ह्याचा स्वीकार करणे, त्याच्यावर अपेक्षांचे ओझे न लादणे, मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्या बरोबर भावनिक रित्या जोडलेले असणे, त्यांच्या जगात काय चालू आहे ह्याचा किमान अंदाज पालकांना असणे गरजेचे असते.
भारतीय समाजात, मूल जन्माला घालण्या आधी पालकत्वाचा, पालकांच्या भूमिकेचा, त्यासाठी लागणार्या क्षमतांचा अजूनही फारसा विचार केला जात नाही. “मुलाला जन्म दिला की सगळे आपोआप जमते” हा समज ठाम असतो. पालकांच्या पालकत्वाच्या धारणा त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडून घेतलेल्या असतात त्या वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध असतातच असे नाही. त्यात पुना: त्यांची स्वतची जडण घडण कशी झाली ह्यावरही त्यांची पालकत्वाची दिशा’ ठरत असते.
“सर्व स्त्रियांना मातृत्वाची आस असते” हा अजून एक भ्रम आपल्या समाजात जोपासला गेला आहे. “मातृत्वा बरोबरच स्त्रियांमध्ये मुलांचे संगोपन करण्याची क्षमताही निर्माण होत असते” हा ही एक समज आहे ज्याला कुठलाही आधार नाही. “स्त्री म्हणजे अनंत काळची माता” “आई सारखे देवत सार्या जगामध्ये नाही” असे म्हणत मातृत्वाचे गौरवीकरण आपल्या समाजात केले जाते आणि एक प्रकारे मातृत्व स्त्रीवर लादले जाते.
एकत्र कुटुंब व्यवस्थेत घरातील जेष्ट व्यक्तींकडून नातवंडासाठी आग्रह धरला जातो त्यामागे वंशाला दिवा, संपत्तीला वारसा ही कारणे असतात. तरुण जोडपही मग कधी पालकांच्या, समाजाच्या आग्रहाखातर मुल जन्माला घालण्याचा निर्णय घेते. ह्या जोडप्यांनाही बर्याचदा मुलांना जन्म देण्याची त्यांची स्वतची अशी कारणं ठाऊक नसतात. “मूल” हे म्हातारपणाची सोय म्हणून बघितली जाते. कधी, आपले कुटुंबातील स्थान अधोरेखित व्हावे म्हणून मुलांना जन्म दिला जातो तर कधी, आपल्याकडे पैसा आहे त्याचा उपयोग व्हावा म्हणून मुलांना जन्म दिला जातो.
ह्या सगळ्यात पालकांची पालक होण्याची ईच्छा, त्यांची मानसिक तयारी ह्यांचा विचार मात्र केला जात नाही. पालकांची जर मानसिक तयारी नसेल, पालकत्वा मधला आनंद पालक घेऊ शकत नसतील तर मुलांच्या संगोपनात त्रूटी व्हायला लागतात ज्याचा मुलांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
मानसिक दृष्ट्या तयार नसलेले पालक मुलांना सातत्यपूर्ण भावनिक आधार, प्रोत्थाहन आणि दिलासा देऊ शकत नाहीत ज्यमुळे मुलांना दुर्लक्षित वाटते. मुलाची तयारी नसलेले पालक सतत चिंता आणि ताण ह्यांनी ग्रासलेले असतात. तणावाखाली असणार्या पालकांचा’ चिडचिडेपणा वाढतो आणि मुलांना वाढवताना त्यांच्याकडून कठोर शिस्तीचा वापर केला जातो ज्याने मुलांच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परीणाम होतो.
पालकांचे आपापसातिल नाते ताणलेले असेल तर घरातल्या संघर्षामुळे मुलही तणावात रहायला लागते. पालकांनी स्वतातली अपूर्णत्वाची भावना भरून काढयला म्हणून मुलांना जन्म दिला असेल तर पालक आपली अपूर्ण स्वप्न मुलांकडून पूर्ण करून घ्यायला बघतात आणि त्या नादात मूल भिती आणि चिंतेने ग्रासले जाते.
मुलांच्या निकोप वाढीसाठी, पालकत्वाचा, त्यातील जबाबदार्यांचा विचार करणे, स्वतच्या मानसिक तयारीचा अंदाज घेणे गरजेचे असते.
सर्व प्रथम “आपल्याला मूल का हवं आहे” ह्याच आपलं स्वत:च अस कारण जोडप्यांनी विचारात घेण गरजेचं आहे. मुलं किमान वीस बावीस वर्षे तरी आपल्या बरोबर राहणार असते तेंव्हा मूल आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होई पर्यंत त्याची जबाबदारी आपल्यावर असणारे हे कायम लक्षात ठेवायला लागते. आपल्याला लहान मुलांमध्ये रमणे आवडते का तो विचार करणे गरजेचे आहे. मुलांना देण्यासाठी प्रेम, माया ह्या भावना आपल्याकडे आहेत का, मुलांशी भावनिक नाते जोडण्याची क्षमता आपल्याकडे आहे का ह्याचाही विचार जोडप्यांनी करायला हवा.
आताच्या धकाधकीच्या आयुष्यात मूल एकट्याने वाढवणे पालकांसाठी अवघड आहे. अश्या वेळी मुलासाठी, पालकांसाठी support system गरजेची असते. अडी नडीला मदतीला धावून येतील अशी आपली विश्वासाची नाती आपल्याकडे आहेत का हा विचारही करायचा. सुरवातीच्या काळात मुलासाठी आपला वेळ आणि स्वातंत्र्य त्याग करण्याची दोन्ही पालकांनी तयारी आहे का ते तपासायचे. मुलांशी विश्वासाचे नाते जोडायचे तर त्या आधी पालकांमध्येही एकमेकांबद्दल प्रेम आणि विश्वास असायला हवा.
पालक आणि मुलांचा एकत्र प्रवास सुलभ व्हायचा असेल तर जोडप्याने मुलाला जन्म देण्याआधीच पालकत्व, त्यातील जबाबदारी, स्वतची मानसिक तयारी ह्या सगळ्याचा विचार करायलाच हवा.


