
मुलाला जन्म देण्याआधी, स्त्री पुरुषाची दोघांचीही पालक होण्याची समसमान ईच्छा असावी लागते. पालकत्व निभावण्याची शारीरिक, मानसिक ताकद असावी लागते आणि मुळात मुलाला प्रेमाने काळजीने वाढवायचे असेल तर त्यासाठी आधी पालकांमध्ये स्वतामध्ये प्रेम भावना भरपूर असावी लागते.
असे म्हणले जाते की मुलं जन्माला आले की आईकडून त्याच्यासाठी आपोआप सगळे प्रेमाने केले जाते तर ते काही खरे नव्हे. पण भारतात मुलं जन्माला घालताना ईतका विचार केला जात नाही. “लग्न केलय तर मुलं आलीच” इतके ते सहज घेतले जाते किंवा कुटुंब आणि समाजाच्या pressure खालीही मुलांना जन्म दिला जातो. अश्यावेळी पालकांची खरी कसोटी चालू होते.
पूर्वीचे पालकत्व तुलनेने सोपे होते. कुटुंब मोठी असायची, शेजार पाजार विश्वासू असायचा, शाळांमधले वातावरण तसे चांगले असायचे. मुलं घरापेक्षा घराबाहेर जास्त मोठी व्हायची. मुलांना, त्यांच्या शालेय वयात role model निवडायला भोवताली अनेक पर्याय असायचे. मुलं आता इतकी पालकांवर अवलंबून नसायची. समजा, एखाद्या पालकांकडून काही कारणाने मुल वाढवण्यात हलगर्जीपणा होत आहे असे वाटले तर मामा, मावश्या, आत्या कोणीतरी मुलांच्या वाढीकडे लक्ष द्यायचे.
आता कुटुंब लहान असतात. प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या असतात त्यामुळे मुलं पूर्णपणे आई वडिलांवर अवलंबून असतात. महागाई आणि वाढवलेल्या गरजा बघितल्या तर दोघांना बाहेर पडून काम करणे गरजेचे आहे. बर पूर्वी सारखी आताची नोकरी 10 ते 6 अशीही नसते. मग बारा बारा तास काम करून मुलं वाढवायची तर पालकांना येणाऱ्या ताणाचाही विचार करायला हवा.
पालकांनी स्वताचा ताण कमी करायचा तर एकच करायचे मुलांकडून वाढीव अपेक्षा ठेवायच्या नाहीत.
– मुलांची शाळा निवडताना, शाळेची fee आपल्या खिशाला परवडते आहे ना हा विचार करायचा. त्या fee साठी आपली फरपट होत नाही ना ते बघायचे.
– शालेय वयातली गुणवत्ता आणि मुलं मोठे झाल्यावरची त्याची employability ह्याचा काही सबंध नसतो. मग अश्यावेळी शाळा, अभ्यास ह्या गोष्टीला किती महत्व द्यायचे आणि त्यावर किती डोकेफोड करायची ते ठरवायचे.
– आपल्या मुलाची इतरांशी तुलना करायची नाही. काही मुलं लहानपणा पासून स्मार्ट , ॲक्टिव वगैरे असतात तर काही नंतरच्या वयात आपापले वेगळे काही करून दाखवतात. त्यामुळे तुलनेत अर्थ नाही.
– हॉबी क्लास पेक्षा घराच्या खाली, ground वर, parking मध्ये मुलं आपापले जे खेळतात त्यातून ती जास्त घडत असतात. मुलं आपापली खेळतात तेंव्हा खेळ त्यांची ती निवडतात, नियम तीच ठरवत असतात. मुक्त खेळात, मुलांची कल्पकता पणाला लागते. खेळताना गटात एक मेकांशी जमवून घेणे, गरज पडेल तेंव्हा गट प्रमुख होणे हे सगळ मुलं आपापले शिकत असतात. म्हणून मुक्त खेळाला प्राधान्य देणे गरजेचे आहे..
– पाच सहा वर्षाच्या मुलालाही छोट्या छोट्या कामांच्या जबाबदाऱ्या देता येतात. जसे की त्याचे खेळ त्याचे त्याने आवरून ठेवणे. ह्याने काय होते तर “आपले पसारे आपली जबाबदारी” हे मुलाला कळते आणि मुख्य म्हणजे आयांचा ताण थोडा कमी होतो.
– आपल्याकडे अजूनही पालकत्वातली मुख्य जबाबदारी आया उचलतात तर त्यांनी बिनदिक्कत उपलब्ध असणाऱ्या सर्वांची मदत घ्यायची.
– हलली मैत्रिणी एकमेकींच्या मुलांना शाळेतून आणणे किंवा मुलांना एकत्र कुठे घेऊन जाणे असे करतात तर तसे पर्याय शोधायचे. माझे मुलं सारखे माझ्या नजरे समोर हवे हा हट्ट कमी करायचा.
– नात्या गोत्यातली माणस चांगली असतील तर सुट्टीला आरामात त्यांच्याकडे मुलांना जाऊ द्यावे. मुलांना बदल होतो आणि पालकांनाही जरा आपापला वेळ मिळतो.
– मुलांनी भविष्यात काय करावे किंवा ती काय करतील ह्यापेक्षा मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे कळीचे मुद्दे आहेत आणि असणारेत.
– शिस्त वगैरे म्हणायची तर बऱ्याचदा पालक जे वागतात तेच मुलं अनुकरण करतात. मुलांनी जसे वागावे वाटते तसे पालकांनी आधी वागायचे.
– मुलांसाठी पैसा कमवून ठेवताना लक्षात घ्यायचे की ,” आपण फक्त आपला पैसा मागे ठेवत नसतो तर आपले विचारही ठेवत असतो जे जास्त महत्वाचे असतात.
– समाजात घडणाऱ्या गोष्टीमध्ये आपण जी भूमिका घेतो त्यावरूनही आपण आपल्या मुलासाठी काय प्रकारचा समाज मागे ठेवतो हे आपण ठरवत असतो. हे लक्षात ठेवायचे.


