ती गोष्ट

रविवारी सकाळी राधिका कपड्यांच्या घड्या घालून बेडवर ठेवत होती. पलीकडे स्टडी टेबलवर लॅपटॉप उघडून सागर बसला होता. समोरचे डॉक्युमेंट्स वाचता वाचता मध्येच, एका हाताची मुठ दुसर्‍या हाताने दाबत होता. थोडा वेळातच तोंडाने चिप् असा आवाज करत लॅपटॉप मिटवून सागर गॅलेरीत निघून गेला. त्याला कोणाचा तरी फोन येत होता.

राधिका हे सगळे शांतपणे निरखत होती. गेले काही महीने सागर एका नवीन प्रोजेक्टच्या कामात व्यस्त आहे हे तिला माहीत होते. उशिरा घरी येणे, सुट्टीच्या दिवशीही त्याचे ऑफिसमध्ये असणे नित्याचे झाले होते. अली अलीकडे सागर सतत फोनवर असायचा. सागर घरातही अलिप्त असायचा. राधिका इतके दिवस दुर्लक्षं करत होती. आज मात्र तिने सागरला काय ते विचाराचे ठरवले होते.

सागर बेडरूम मध्ये परतं आला तेंव्हा राधिकाने त्याला विचारले,”सागर काय झालय? कसली चिंता करतो आहेस इतकी”? सागर म्हणाला, “काही नाही ग नवीन प्रोजेक्टच काम चालू आहे, तुला माहीत आहेच की ! त्याच जरा प्रेशर आहे, बाकी काही नाही !!

“अरे पण इतके वर्ष व्यवसाय करताना मी तुला बघते आहे, पूर्वी तर तू घर आणि व्यवसाय ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवायचास..मग आताच काय असे झालेय ?

“आत्ताचा क्लायंट जरा जास्तच डीमांडींग आहे म्हणून जरा कसरत होते आहे.. तुला ना, नसते विचार करायची, परिस्थितीच भयंकरीकरण करायची सवय लागली आहे.” तिला टाळत सागर म्हणाला.

शेवटचे वाक्य राधिकाला बोचले. आवाज वाढवत ती म्हणाली, “गेले अनेक दिवस मी बघते आहे, एकतर तू कामात असतोस नाहीतर मोबाइलमध्ये डोके खुपसून असतोस, घरात सगळ्यांच्यात असूनही नसल्या सारखा असतोस. अनेक दिवसात आपण दोघे कोठे फिरायला गेलो नाही. तुला जाणवले नाही का हे? पियूपण तू घरी नसतोस ह्याची सारखी तक्रार करत असते. कामं मला नाहीयेतं का? मी मॅनेज करतेच की सगळे, मी नाही कधी घराकडे, मुलीकडे, आई – अण्णांकडे दुर्लक्ष केलं”.

“बर बाई तू महान, आता मला आवरुदे, महत्वाच्या मिटींगसाठी बाहेर जायचे आहे” सागर उत्तरला.

राधिकाला, तिच्या बोलण्यातले दू:ख सागर समजावून घेत नाही हे बघून कुठेतरी झिडकारल्या सारखे वाटले. ती आणखी काही बोलणार तेवढ्यात सागरच्या हातातला फोन परत वाजायला लागला. सागर फोन उचलून हॅलो म्हणेपर्यंत राधिकाने रागाच्या भरात, स्वताच्याही नकळत सागरच्या हातातला फोन झडप घालून काढून घेतला. राधिकाला फोन खरे तर बंद करायचा होता पण चुकून स्पीकर ऑन झाला. पलीकडून आवाज आला, “सागर कुठे आहेस? मी ऋतुगंध रिसॉर्ट मध्ये पोहोचलेही आहे, एक तर ऑफिसमध्ये आपल्या दोघांना मोकळा असा वेळ मिळत नाही आणि..

सागरने पटकन फोन राधिकाकडून काढून घेत बंद केला. आता तो अडकला होता, त्याला प्रतिवाद करायला शब्द सापडत नव्हते. राधिका म्हणाली, सागर बास झाले तुझे मला गोल गोल गुंडाळणे, काय ते खरे खरे ‘सांग. सागर शेजारच्या खुर्चीत खाली डोकं घालून, कपाळावर उजव्या हाताची मूठ टेकवत बोलला, “मी दुसर्‍या एका मुलीच्या प्रेमात आहे, माझ्या ऑफिस मध्येच ती काम करते, एक दीड वर्ष झाले.”

“अजीब दासता है ये कहा शुरू कहा खतमं” सागरच्या मोबाईलची रिंगटोन वाजत होती, स्क्रीनवर “साक्षी” नाव झळकत होते. राधिका काही न बोलताच तिथून निघून गेली.

सागरने साक्षीला काहीतरी सांगत, समजावत फोन बंद केला आणि बाजूला फेकून दिला. राधिका काहीच बोलली नाही ह्याने तो जास्त अस्वस्थ झाला होता. ती चिडून बोलली असती, भांडली असती तरी चालले असते पण राधिकाचे अश्या शांत बसण्याने त्याची बैचेनी वाढली होती.

राधिका, पीयूच्या खोलीत खिडकीतून बाहेर बघत राहिली. बाहेर लक्ख उजेड होता तरी तिला कोंदटल्यासारखे वाटायला लागले. “सागर आपल्यापासून दूर जातो आहे हे मला कसे कळले नाही? इतके दिवस ‘त्याचे काम आहे, त्याला त्रास नको’ असे मी स्वताला समजावत बसले होते, तेंव्हाच का नाही मी त्याला विचारले? त्याच वेळी मी त्याला विचारले असते तर कदाचित त्याला थांबवता आले असते. मुळात आमच्या नात्यात कधीपासून अंतर पडायला सुरवात झाली? असे कसे नाते माझ्या हातातून निसटले? एक न दोन, विचारांचा पाऊस नुसता राधिकाच्या मनात थैमान घालत होता. आज, पियू तिच्या आज्जी आजोबांबरोबर आत्याकडे गेली होती त्यामुळे त्यांना कोणाला लगेच सामोरे जाण्याची वेळ राधिकावर आली नाही.

नंतरचे काही दिवस तिची अस्वस्थता तशीच होती. ती घरात मोजके बोलायची, जास्त वेळ ऑफिस मध्ये घालवायची. सागरच्या आईना कुसुमताईना काहीतरी घरात बिनसल्याचे जाणवत होते. पियू दिवसभर शाळा करून घरी आली की “आईचे माझ्याकडे लक्षच नसते” अशी भुणभूण करत आजीच्याच खोलीत येऊन बसायला लागली. एके संध्याकाळी राधिका कामावरून घरी येऊन, फ्रेश होऊन जरा पेपर चाळत हॉलमध्ये बसली होती तेंव्हा कुसुमताई तिच्यासाठी चहा घेऊन आल्या. तिच्या जवळ बसून कुसुम ताईंनी तिला विचारले, “ राधिका काय झालय नेमक? तू शांत असतेस, सगरही अलिप्त असतो, घरात तुम्ही दोघ रोबो सारखे वावारत असता. इतके काय बिनसले आहे तुम्हा दोघांत ज्याने घरचे वातावरणही झाकोळून जावे?

“हे तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा” राधिकाने तिरकस उत्तर दिले. “हे बघ राधिका, तुझे हे उत्तर मला आवड्लेले नाही, एरवी तूच सगळे समोरा समोर बोलण्याचा आग्रह ध्ररतेस न, मग आता का शांत आहेस? तुमच्या वागण्याचा घरावर, तुमच्या मुलीवर आणि घरातल्या दोन वृद्ध माणसांवर परीणाम होतो आहे हे तरी तुम्ही लक्षात घ्यायला हवे की नको? कुसुमताईंच्या आवजात अस्वस्थता, वैताग, काळजी जाणवत होती.

राधिका स्वतला सावरत म्हणाली, “ आई आम्हा नवरा बायकोच्या नात्यात आता अंतर पडले आहे, सागरच्या आयुष्यात दुसरी एक व्यक्ती आली आहे, त्याच्या ऑफिसमध्ये काम करणार्‍या मुली सोबत त्याचे प्रेमाचे सबंध आहेत.

“छे ग, काही तरी काय? “समंजस बायको आणि लाडाची मुलगी असताना त्याला बाहेरच्या प्रेमाची गरजच काय” कुसुमताईन्च्या बोलण्यात अविश्वास होता. राधिका म्हणाली, “आई, आहे हे असं आहे; का ते सागरच तुम्हाला सांगेल” असे म्हणत राधिकाने दुसरीकडे नजर वळवली.

कुसुंमताई अस्वस्थ झाल्या त्यांनी सागरच्या बाबांच्या हे कानावर घातले. सागरच्या वडिलांना कुसुंमताईंची चिंता कळत होती पण “नवरा बायकोच्या वादात आपण पडू नये, मुलगा सून त्यांचे ते बघून घेतील, आपण फक्त पियुकडे जरा जास्त लक्ष देऊ, तिला जपू” असे त्यांना वाटत होते. कुसुमताईनी अण्णांचे बोलणे नुसते ऐकून घेतले पण त्यांना ते पटले नव्हते. घरचे वातावरण बिघडवून टाकणार्‍या त्यांच्या मुलाचा सागरचा त्यांना राग आला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी जरा उशिरा सागर स्वयंपाकघरात चहा घ्यायला आला, वेळ बघून मागोमाग कुसुंमताई स्वयंपाकघरात गेल्या. सागर चहा करण्यासाठी फ्रिजमधून दूध बाहेर काढत होता, त्याच्या हातातून पातेलं घेत कुसुंमताई म्हणल्या,” चहा थर्मास मध्ये तयार आहे तोच देते.”

थरमास मधून चहा कपात ओततं त्या म्हणल्या, “सागर तूझे चुकलेच बघ, तू राधिकाला दुखवायला नको होतेस, इतका सुरेख संसार सोडून बाहेरच्या प्रेमाचा मोह तुला का पडावा? सागरला काय बोलावे कळेना, त्याच्या आईने केलेल्या अचानक हल्ल्याने तो काहीसा गांगरला, त्याला रागही आला. तेवढ्यात तेथे आण्णाही आले. आता सागरला घरच्या लोकांच्या नजरेला नजर देणे नको झाले होते. “घरचे लोक, आपण एखादा गुन्हा केल्यासारखे आपल्याकडे बघत आहेत” असे त्याला वाटायला लागले.

तो त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला आता साक्षीची आठवण यायला लागली. मोठ्या कुरळ्या केसांची, हातात, गळ्यात चांदीचे दागिने घालणारी, खळखळून हसणारी, मनात असेल ते बिनधास्त बोलणारी, काहीशी अवखळ वाटावी अशी साक्षी सागरला आवडली होती. सागरच्या काहीश्या स्थिरावलेल्या आयुष्यात साक्षीच्या येण्याने खळबळ माजली होती. प्रेमातली ओढ, हुरहूर, अस्वस्थता, उत्साह हे सगळे त्याला नवीन आणि मोहवणारे वाटत होते. सागर गडबडीने उठला त्याने स्टिकी नोटवर काही मजकुर लिहून कपाटावर चिकटवून टाकला आणि लगेच बॅग भ्ररायला लागला.

संध्याकाळी राधिकाने चिठ्ठी वाचली, त्यावर सागर दोन चार दिवसासाठी बाहेरगावी जात असल्याचे लिहले होते. पियू आजच तिच्या बाबा बरोबर स्पोर्ट्स शूज आणायला बाहेर जाणार होती. तसे दोघांनी ठरवलेही होते पण बाबा न सांगता बाहेर गावाला गेला म्हणून ती रुसून बसली. पीयूच्या आज्जी आजोबांनाही काय बोलावे ते सुचेना. पीयूने आज्जीच्या फोन वरुन तिच्या बाबाला फोन केला आणि तो अचानक कोठे गेला असे त्याला विचारत रडायला सुरवात केली. बाबाने पलीकडून ‘काम संपवून दोन चार दिवसात घरी येतो, काळजी करू नको’ असे सांगितल्यावर काहीशी ती शांत झाली.

सागर बाहेरगावी नव्हे तर साक्षीच्या फ्लॅट वर गेला होता. सागर आला म्हणून साक्षी खुश होती पण सागरच्या चेहर्‍यावर कायम असणारे स्मितहास्य आज गायब झाले होते. साक्षीला वाटत होते त्या दोघांनी भरपूर गपपा माराव्यात, खरेदी करायला जावे पण सागर त्याच्याच नादात होता. दोन चार दिवस असेच गेले. सागर, ऑफिसमधून साक्षीच्या घरी आला तरी काम समोर घेऊन बसायचा. साक्षी त्याला खुश करायला नवनवीन पदार्थ करायची, त्यांच्या प्रेमाच्या सुरवातीच्या दिवसांची आठवण काढायची पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. मग मात्र ती फार वैतागली.

“सागर बास झाले तूझे कधी इथे कधी तिथे करणे, तू सरळ तुझे घर सोडून इथेच का रहायला येत नाहीस? एक दिवस साक्षीने त्याला विचारले. सागर मोबाईलमध्ये मेसेज वाचत होता त्यामुळे त्याचे साक्षीकडे लक्ष नव्हते, मेसेज वाचून तो आवरा आवरी करायला लागला. “सागर काय चाल्लय तुझ? तू कुठे निघालास? तू कुठेही जायचे नाहीस, मी नाही तुला जाऊ देणार, कधी नव्हे ते आपल्याला असा एकत्र वेळ मिळाला आहे आणि तू कोठे मला एकटीला सोडून जातो आहेस? आज ऑफिसला तूही सुट्टी घे, मी जेवायला तुझ्या आवडीची गव्हाची खीर करते. सागर, साक्षीला काही सांगू बघत होता पण तिचे पुढे पुढे काहीतरी बोलणे चालूच होते.

“मूर्खा सारखे वागू नकोस, वेळ काळ बघून वागत जा, सारखे स्वतच्या नादात असतेस, सगळ्या गोष्टी तुला तुझ्या सोईनुसार तुला व्हायला हव्या असतात, आजूबाजूच्या लोकांचा विचार करायला शिक जरा! मी घरी जातो आहे पियुला ताप आला आहे, मला अडवू नको. सागर तीव्र स्वरात बोलून निघून गेला.

ईकडे पियू आईच्या कुशीत शिरून बसली होती. आई आणि बाबामध्ये काहीतरी मोठे भांडण झाले आहे आणि कदाचित म्हणूनच बाबा घर सोडून कुठेतरी गेला आहे असा अंदाज, भीती तिला वाटत होती. पियूने आईला विचारले, “आई, बाबा आणि तू वेगळे होणार का ग? ह्या प्रश्नाने राधिका दचकली. राधिका पियूच्या डोक्यावरुन हात फिरवत, तिला कुरवाळत म्हणाली, “काळजी नको करू पियू, मी कुठेही जाणार नाहीये आणि बाबाही लवकरच घरी येतो म्हणाला आहे” हे ऐकून पियूला फार हलके वाटले, आईला चिकटून ती झोपी गेली.

संध्याकाळी सागर घरी आला तेंव्हा पियूचा ताप कमी झाला होता. पियुला तिचे आजोबा Born Free मधल्या एल्सा नावच्या सिंहिणीची गोष्ट सांगत होते. आई पियूसाठी मुगडाळीच्या पिठाचे घावन तयार करतं होती तर आज्जीने पियूच्या तोंडाला चव यावी म्हणून रव्याची खीर केली होती. बाबाला घरी आलेला बघून पियू खुश झाली. आखे घर तिच्याभोवती एकत्र आलेले बघून ती आनंदली होती.

तिकडे साक्षी, सागर गेल्या पासून सैरभैर झाली होती. त्याच्या बोलण्याने ती दुखावली होती. चेहर्‍यावर कायम स्मितहास्य असणारा, तिची बडबड ऐकून घेणारा, तिच्या एकटेपणात तिला धीर देणारा सागर आज वेगळाच भासत होता, किती तोडून बोलला होता तो आज !!

“असे काय मी वागले की माझे वागणे त्याला स्वार्थी, आत्ममग्न वाटावे? वेळ आली तेंव्हा त्याच्या कुटुंबाला त्याने प्राथमिकता दिली आणि मी परत काठावरच राहिले. विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडून मी चूक केली का? पण प्रेम ठरवून थोडीच केले जाते. प्रेम म्हणजे संप्रेरकांचे घोळच नव्हेत का? आणि बाया तरी काय माझ्या सारख्याच वेड्या असतात, प्रेमात विरघळून जातात, पुरुषाच्या मागेमागे करतात. त्याला खुश करायला बघतात, त्याच्या आनंदात स्वतचा आनंद मानतात आणि पुरुष मात्र मनात आले की बाईला एकटे सोडून निघून जातात.” असंख्य विचार साक्षीला छळत होते. केंव्हाची ती तशीच बसून होती. केस विस्कटलेले होते, अंगात कालचेच कपडे एव्हाना घामेजले होते. बाहेर अचानक गार वारा सुटला, धुळीचे लोट घरात यायला लागले. साक्षीला एकदम शहारून आले. ती उठली तिने खिडक्या बंद केल्या, केस नीट बांधले, घरातला केर काढून घेतला, अंगातले कपडे काढून, ते मशीनला लावून ती शॉवरखाली जाऊन उभी राहिली.

आवरून झाल्यावर तिला भुकेची जाणीव झाली. तिने कुकर लावला. ताटात वरण भात कालवून घेतला, बरोबर लिंबाची फोड घेतली. दोन घास पोटात गेल्यावर तिला जरा बरे वाटले. जेवल्यावर अंगात थंडी भरून आल्यासारखे तिला वाटले म्हणून तिने स्वेटर घातला. आपल्यालाही पियू सारखा ताप यावा असे तिला वाटले. गरज नसताना तिने क्रोसिन घेतली आणि पांघरूण घेऊन पडून राहिली. थोड्यावेळातच साक्षीला गाढ झोप लागली. तिच्या स्वप्नात तिची आज्जी आली. साक्षी आज्जीच्या मांडीवर डोक ठेवून झोपली होती आणि आज्जी साक्षीला थोपटत गाण म्हणत होती. आज्जीचा स्पर्श आणि आवाज ह्यात इकता दिलासा होता की पोटात खड्डा पाडणार्‍या उद्याच्या अनिश्चिततेपासून काही काळासाठी का असेना साक्षीची सुटका झाली होती.

– समाप्त-

Social Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top