
दत्त आपटे म्हणजेच DN सर हे एक स्वातंत्र्य सैनिक, शिक्षण तज्ञ, कामगार नेते, क्रिडापटू आणि साहित्यिक असे बहुआयामी व्यक्तीमत्व होते.
दत्त नारायण आपटे ह्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1910 साली झाला. दत्त आपटे ह्यांचे वडील नारायण आपटे ह्यांकडे डफळापुर गावची जहागिरी सांभाळण्याची जबाबदारी होती. कामाच्या निमत्ताने पुण्यास गेलेल्या नारायणरावांचा प्लेगने मृत्यू झाल्यावर आपटे कुटुंब सांगलीस राहण्यास आले. दत्त आपटे ह्यांचे प्राथमिक शिक्षण शाळा नंबर दोन येथे तर माध्यमिक शिक्षण सिटी हायस्कूल मधून पूर्ण केले. शालेय वयात दत्त आपटे / DN सरांना पुस्तकी अध्ययना पेक्षा खेळाची आवड जास्त होती. पोहणे आणि मल्लखाम ह्यात विशेष प्रावीण्य होते. त्यांची वकृत्वावर पकड होती. अंगच्या बंडखोर वृत्तीमुळे, शालेय वयात ब्रिटिश सरकार विरोधात केलेल्या भाषणामुळे ते कायम चर्चेत असत. 1930 मध्ये त्यांनी मेट्रिक परीक्षा दिली पण आर्थिक टंचाई मुळे त्यांचे शिक्षण तेथेच थांबले.
तो काळ असा होता की देशप्रेमाने अनेक तरुण आपले घरदार, प्रपंच बाजूला ठेवून इंग्रज सरकार विरोधात रस्त्यावर उतरले होते. सहाजिकच दत्त आपटे स्वातंत्र्य लढयात ओढले गेले आणि सशस्त्र चळवळीत समिल झाले. शोभेच्या दारुपासून शस्त्रास्त्रे बनवण्याची आणि ती क्रांतिकारकांना पुरवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतच्या खांद्यावर घेतली. आपटे सरांची बक्षी बोळातील अभ्यासाची खोली म्हणजे छोटा दारूगोळ्याच्या कारखानाच होता. आपटे सरांवर पोलिसांचा संशय असायचा, रात्री अपरात्री घरावर धाडी पडायच्या पण त्यांच्या अतंत्य चाणाक्ष स्वभावामुळे ते कधी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अज्ञातवासाच्या काळात अनेक भूमिगत क्रांतिकारी आपटे सरांच्या घरात मुक्कामी असत. ह्या काळात सर्व क्रांतीकारकांची कुटुंब सदस्यासारखी काळजी घेतली जात असे. स्वातंत्र्य चळवळीत फक्त DN सर एकटे नव्हते तर त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या साथीने उतरले होते असे म्हणता येईल. एकदा शोभेची दारू तपासताना मोठा स्फोट झाला आणि अख्खा जाळ सरांच्या चेहऱ्यावर आला पण जिवाचा धोका चेहऱ्यावर निभावला. मोठ्या हिमतीने डीएन सर ह्या प्रसंगातून बाहेर पडले. असे किती प्रसंग आले गेले पण भारताच्या स्वातंत्र्यासाठीचे सरांचे काम अविरत चालूच राहिले. सरांनी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारी पेन्शन घ्यायचे मात्र नाकारले. “पेन्शन साठी मी काम केले नाही” ही त्यांची भूमिका होती.
डी. एन सरांनी यंगमेंन्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रताप हायस्कूलची स्थापना केली त्यावेळी म्हणजे 1935 साली सरांचे वय होते अवघे पंचवीस वर्षे. त्यांचे स्वताचे शिक्षण आर्थिक परिस्थितीने थांबले होते पण त्यातून प्रेरणा घेत समाजातील सर्व स्तरातील मुलांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे ह्या ध्येयाने त्यांना वेढले. शाळेची उभारणी करणे सोपे नव्हतेच ती म्हणजे एक तपश्चर्याच होती. 1939 साली ‘प्रताप मॉडेल हायस्कूल’ नावारुपाला आल्यावर गरीब विद्यार्थ्यांना शाळेत शिकता यावे यासाठी खास तजवीज त्यांनी केली. शाळा खाजगी मालकीची न राहता ‘सार्वजनिक शिक्षण संस्था’ म्हणून ती उभी रहावी ह्या साठी त्यांनी अफाट कष्ट उपसले. संस्था नुसती उभारून चालत नाही तर ती सतत विकसित करावे लागते त्या साठी अनेकांना शाळेच्या कामाशी जोडण्याचे काम डीएन सरांनी केले. त्यातूनच मग स्वतंत्र सभागृह, वाचनालय, क्रीडांगण तांत्रिक शिक्षण विभाग उभे राहिले. इतकेच काय संस्थेच्या आजीव सेवा सदस्यांना माफक दरात घर बांधणीसाठी जागा मिळावी म्हणून “विकास घरबांधणी संस्था” त्यांनी उभी केली.
शाळेचे काम करत असताना डीएन सरांनी त्यांचे मागे पडलेले शिक्षण पूर्ण केले. BA बरोबरच क्रीडा क्षेत्रातील पदविका (BPed) त्यांनी संपादन केली. राष्ट्रभाषा हिंदीच्या परीक्षा दिल्या. त्यांचे संस्थापक म्हणून काम जितके उल्लेखनीय आहे तितकेच ते उत्तम शिक्षक म्हणूनही प्रसिद्ध होते. पाठ्य पुस्तकापलीकडचा इतिहास शिकवणारे, इंग्रजी भाषा शिकवताना इंग्रजी साहित्यावर भरभरून बोलणारे, मुलांना खेळातील प्रावीण्यासाठी प्रोत्साहन देणारे डीएन सर विद्यार्यांचे खास लाडके होते.
शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच साम्यवादी विचारातून ते कामगार चळवळीकडे वळले. सांगली साखर कारखाना, भिडे अँड सन्स कारखाना, मध्यवर्ती बँक ह्या सर्व ठिकाणी युनियन लीडर म्हणून त्यांनी काम बघितले. कामगारांचे हित जपले जावे ह्या हेतूने त्यांनी कामगार प्रश्नांना हात घातला पण संस्था चालकांशी वितुष्ट न आणता समजोत्याने प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल होता. ह्यातच ते उत्तम राजकारणी होते हे दिसून येते. राजकारण म्हंटले की दुधात माशी पडावी तसे आपले चेहरे होतात पण तो काळही वेगळा होता आणि लोकांचे प्रश्न कुशलतेने हाताळणारे राजकारणी अस्तित्वात होते. दत्त आपटे सेवा दलात कार्यरत होते काँग्रेसच्या सुरवातीच्या दिवसात पक्षाच्या कार्यक्रमबांधणी मध्ये त्यांचा सहभागही होता. त्यांचा लोकशाही मूल्यांवर अगाध विश्वास होता. ती मुल्यं त्यांनी स्वतः मध्ये रुजवली होती, त्यांचे विरोधी विचार सरणीच्या लोकांशीही सौदाह्याचे संबंध होते.
भारता सारख्या प्रचंड मोठ्या देशाला प्रगती पथावर आणायचे तर “सहकार तत्व” महत्वाचे आहे हे ते जाणून होते. त्यातूनच शिवसदन ह्या ग्रामीण जीवनाला पूरक घरबांधणी करणाऱ्या “ग्रामीण सहकारी संस्थेचा” उगम झाला आणि त्याचा पाया दत्त आपटे ह्यांनी रोवला. दत्त आपटे एक व्यासंगी साहित्यिकही होते. आयर्लंडचा स्वातंत्र्यसेनानी डॉन ब्रिन यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद त्यांनी केला. समाजसुधारक आगरकर ह्यांच्या पत्नी यशोदाबाई ह्यांनी सांगितलेल्या आठवणीचे संकलनही त्यांनी केले. त्यांनी एकूण 24 पुस्तकांचे लिखाण केले त्या पैकी 17 प्रकाशित होऊ शकली. काही पुस्तकं त्यांची पत्नी उषा आपटे ह्यांच्या नावे प्रकाशित केली तर काही लेख अन्य संस्थांच्या नावे प्रकाशित केले. आपल्या लिखाणाने आपल्या इतर कामात अडथळा येऊ नये हा उद्देश तर होताच पण संस्थेच्या नावे लेखन केले तर मिळणारे मानधन संस्थेच्या कामी वळवता येत असे उदात्त कारण होते.
त्यांना इतिहासाची विलक्षण आवड होती. इतिहासातील धाडसी नायकांचे चित्रण, त्यांनी लिहलेल्या ऐतिहासिक कादंबर्यांमध्ये दिसून येते. आपटे सरांनी फ्रेंच साहित्यिक अलेक्झांडर ड्युमाची इंग्रजी भाषेतली पुस्तके गोष्टी रुपात मराठी भाषेत रसिकांसमोर आणली. 17 व्या शतकातील फ्रेंच राजा लुई आणि त्याच्या ताफ्यातील तडफदार शिलेदार ह्या भोवती गुंफलेली “तीन शिलेदार विस वर्षानंतर, लोखंडी मुखवटा ही पुस्तकं त्यांनी लिहली. अमेरिका हा आर्थिक दृष्ट्या ताकदवर देश. अमेरिकेच्या यशाच्या वाटचालीत तिच्यावर नेतृत्व करणाऱ्या अध्यक्षांच्या कामाचा मागोवा घेणाऱ्या पुस्तकाचा अनुवाद दत्त आपटे ह्यांनी ” अमेरिकन अध्यक्षांच्या गोष्टी” ह्या नावाने केला. टॉलस्टॉयची “वॉर अँड पिस”, चार्ल्स डिकन्सची ” टेल ऑफ टू सिटीज ह्या कादंबऱ्यांचा अनुवाद केला.
“तारस बुल्बा”, “क्लीओप्यात्रा” ह्या ऐतिहासिक कथा मराठीत आणल्या. स्वतःची प्रगती करताना माणसाने निसर्गाची केलेली वाताहत त्यांनी त्यांच्या “निसर्ग संपत्ती आणि मानव” ह्या पुस्तकातून प्रभावीपणे मांडली. जगभरातील मुलांचे लाडके पात्र “ऑलिव्हर ट्विस्ट” ची त्यांनी आपल्या पुस्तकातून मराठी मुलांना ओळख करून दिली. आजच्या इस्त्राईल-पॅलेस्टाईन प्रश्नांची मुळे शोधून काढायची असतील तर दत्त आपटेनी लिहलेले “पॅलेस्टाईन” पुस्तकं जरूर वाचायला हवे. तर असे अनेकविध प्रकारातील विपुल लेखन दत्त आपटे ह्यांनी केले.
शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य सगळ्या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणारे डीएन सर त्यांच्या कुटुंबातही तितकेच लाडके होते. ते बाहेर जितके सहज वावरत तितकेच त्यांच्या नात्या गोत्यात सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जात. त्यांनी त्यांच्या भाच्यांवर, पुतण्यावर मुलांसारखे प्रेम केले. त्यांची पत्नी “उषा आपटे” ह्यांचा गृहिणी म्हणजे गृहमंत्री म्हणून कायम आदर केला. देवावर अपार श्रद्धा केली पण तिचे कधी स्तोम माजवले नाही आणि त्यांची श्रद्धा त्यांनी इतरावर कधी लादली नाही. असे डीएन सरांचे प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते.


